संगमनेर : सात महिन्यापूर्वी वकिलाचे घरी चोरी झाली होती. त्यावेळी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून आणि शुक्रवारी (दि.१५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादातून वकिलावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी वकिलास वाचविण्यास आलेले त्यांचे दोन्ही भावांवर सुद्धा हल्ला झाला. यात तिघेही जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील मच्छी सर्कल परिसरात घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
वकील शरीफखान रशिदखान पठाण (रा. सुकेवाडी रस्ता, माताडे मळा, संगमनेर) आणि त्यांचे भाऊ रिजवान पठाण, आसिफ पठाण (दोघेही रा. कुरण रस्ता, संगमनेर) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. सादिक रज्जाक शेख, आयान सादिक शेख, इमरान बशीर शेख, जुनेद सादिक शेख, आयाज रज्जाक शेख, कदीर नुरमहमद शेख, अश्फाक इब्राहिम पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत. वकील शरीफखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे.