पारनेर (जि. अहमदनगर): लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवर शरद पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके यांनी भाजपाचे सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मतांवर समाधान मानावे लागले. अजित पवार गटातून आयत्या वेळी शरद पवार गटात गेलेले निलेश लंके जिंकून येणार नाहीत असा दावा अजितदादा गटाने केला होता, पण लंके यांनी दमदार विजय मिळवला. या विजयाला दोन दिवसही झाले नाही तर लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे हल्ला झाला.
खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे आज गुरुवारी दुपारी एक वाजता हल्ला करण्यात आला. झावरे हे पारनेर बसस्थानकाजवळ मोटारीत असतानाच वाहनांच्या काचा फोडून झावरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात येणार आहे. हल्ला झालेले निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर नगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्राणघातक हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर लंके समर्थकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान झावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झावरे यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. झावरे यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत कुणावरही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा राजकीय कार्यकर्ते आमने-सामने आल्याने दिसत आहे.