श्रीगोंदा (अहमदनगर) : श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री शिवारात वाळू तस्कर व महिलांनी कुऱ्हाड, काठ्यांनी प्रांताधिकारी गोविंद दानेज, मंडलाअधिकारी विलास आजबे व गाडी चालक नामदेव तांदळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले असून शासकीय गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. पुन्हा वाळूच्या गाड्या पकडण्यासाठी आलात तर गोळ्या घाऊन ठार मारू अशी धमकी देण्यात आली. तसेच तिघांना डांबुन ठेवण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास बनपिंप्री शिवारातील पठारे वस्तीजवळ ही घटना घडली.
हल्लेखोरांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी गोविंद दानेज, मंडलाधिकारी विलास आजबे व गाडी चालक नामदेव तांदळे हे दुपारी तीन वाजता आढळगाव शिवारात आले. त्यांनी हिरडगाव रस्त्यावर एक वाळूचा टॅक्टर पकडला. चवरसांगवी शिवारात सीना नदीत वाळू उपसा चालू असल्याची त्यांना माहिती मिळली.
संध्याकाळी सहा वाजता चवरसांगवीला पथक गेले. माघारी येत असताना नगर सोलापूर रोडवर वाळूचा एक टिपर दिसला त्यांचा पथकाने पाठलाग केला. महसुल पथक पुढे येऊ नये म्हणून पठारे वस्ती रोडवरील पांदीत टिपर चालक सुनील दिलीप पठारे याने वाळू रस्त्यावर फेकली. पथक पोहचताच त्यांनी तेथील लोकांनी शिवीगाळ केली चार पुरुष दोन महिला घटनास्थळी आल्या त्यांनी आमचा टिपर पकडता काय म्हणून तिघांवर कुऱ्हाड काठ्या गजाने हल्ला चढविला. एकाने दानेज यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली पण दानेज यांनी घाव चुकवला म्हणून जीव वाचला. कपडे काढून तिघांना मारहाण करण्यात आली तसेच डांबून ठेवले. पुन्हा आलात तर गोळ्या घाऊन ठार मारू अशी धमकी देण्यात आली.
तहसीलदार महेंद्र महाजन व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी टिपर जप्त केला रात्री बारा वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रांताधिकारी गोविंद दानेज यांनी स्वत: फिर्याद दिली असून पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी बनपिंप्रीकडे रवाना झाले आहे.