सुपा : महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री सुपा पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी सोमवारी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.२७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बन्सी रामचंद्र कांबळे, शिवानी बन्सी कांबळे, तेजश्री बन्सी कांबळे (सर्व राहणार सुपा), त्यांची पाहुणी मंदा संपत गांगुर्डे (रा.चेंबूर, मुंबई) व अशोक पिराजी जाधव (रा.सुपा) हे फिर्याद देण्यासाठी सुपा पोलीस स्टेशनमध्ये आले होते. यावेळी ड्युटीवर असलेल्या भिमाबाई रेपाळे या महिला पोलीस कर्मचारी फिर्याद घेण्याचे काम करीत असताना सर्व्हर डाउन झाले. त्यामुळे फिर्याद घेण्यास विलंब होऊ लागला. यावेळी या पाचही आरोपींनी तुम्ही फिर्याद घेण्यास टाळाटाळ करता काय? असे बोलून रेपाळे यांंना अपशब्द वापरले. यावेळी रेपाळे यांनी शिवानी कांबळे, तेजश्री कांबळे, मंदा गांगुर्डे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी रेपाळे यांना शिवीगाळ करून तुमच्या विरोधात ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करून तुमची नोकरी घालवतो, अशी धमकी दिली. यावेळी शिवानी कांबळे हिने रेपाळे यांचा गळा दाबला तर तेजश्री कांबळे व मंदा गांगुर्डे यांनी मारहाण करून जखमी केले. यावेळी बन्सी कांबळे व अशोक जाधव यांनीही त्यांना मदत केली, असेही फियार्दीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे करीत आहेत.