लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : आगामी महापौर पदासाठी सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्या पत्नी शीला चव्हाण यांचे तर, शिवसेनेकडून संजय शेंडगे यांच्या पत्नी रोहिणी शेंडगे यांची नावे पुढे येत आहेत. काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ कमी असले तरी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील काँग्रेसचे वजनदार मंत्री आहेत. सेनेचे मंत्री या नात्याने महापाैर निवडणुकीची सूत्रे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे येतील, असे दिसते. त्यामुळे महापौर निवडणुकीतही या दोन मंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे दोन्ही मंत्री कुणाच्या मागे ताकद उभी करतात, त्यावरच नगरचा पुढचा महापौर ठरणार आहे.
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीत झालेला आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकही या तिन्ही पक्षांनी एकत्र लढविली. त्यापूर्वी झालेल्या महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही हे पक्ष एकत्र आले होते. अर्थात सेनेकडून जलसंधारण मंत्री गडाख यांनीच त्यासाठी पुढाकार घेतलेला होता. त्यानंतर प्रथमच आता महापौरपदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही सेनेकडून गडाख यांच्यावर जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील स्थानिक नेत्यांना एकत्र आणण्याचे शिवधनुष्य गडाखच पेलू शकतात, असा एक मतप्रवाह आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत गडाख यांनी ते सिध्दही केले आहे. महापालिकेत शिवसेना नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे महापौरपदावर सर्वात आधी सेनेने दावा ठोकला. त्यापाठोपाठ काँग्रेसने चव्हाण यांचे नाव पुढे करत महापौरपदावर दावा सांगितला आहे. पण, मनपात राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष आहे. तिन्ही पक्षांमध्ये ज्याची ताकद जास्त, त्या पक्षाला महत्त्व, असे सत्ता स्थापनेचे सूत्र आधीच ठरलेले आहे. या निकषानुसार शिवसेनेचे पारडे जड आहे. परंतु, सेना गटातटात विभागली गेली आहे. त्यांच्यात स्थानिक पातळीवर एकमत होईल, अशी परिस्थती अजिबात नाही. अप्रत्यक्षरित्या काँग्रेससाठी ही संधी आहे. परंतु, त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची काँग्रेसला मदत घ्यावी लागेल. तसेच थोरात यांना वरिष्ठ पातळीवर आपले वजन वापरावे लागेल. चव्हाण हे थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे थोरात हे त्यांच्यासाठी आग्रही राहतील. मंत्री थोरात व गडाख यांनी ठरविल्यास ते शक्यही आहे. परंतु, सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ते मान्य राहिल का हा एक प्रश्न आहे.
....
शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर महापालिकेतील पक्षीय संख्याबळाची माहिती घेतली. ही आकडेवारी पाहिल्यानंतर नगरचा आगामी महापौर शिवसेनेचाच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय रस्सीखेच सुरू होणार आहे.
------
फोटो
बाळासाहेब थोरात
शंकरराव गडाख
संग्राम जगताप