नेवासा : तालुक्यातील सौंदाळा येथील नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीच्या आत्याच्या मुलाने दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाने ‘नाजूक’ वळण घेतल्याने धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे़
सौंदाळा येथील एका अल्पवयीन मुलीचा गळा दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले होते़ त्यावरुन सोमवारी अज्ञात इसमाविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र, सोमवारी रात्री चौकशी दरम्यान तिच्या आत्याचा मुलगा आप्पासाहेब नानासाहेब थोरात (वय २२, रा. आपेगाव, ता. पैठण, जि़ औरंगाबाद व हल्ली रा. सौंदाळा) यानेच तिचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली़.
पोलिस हेडकॉन्स्टेबल भीमराव पवार यांनी फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीत म्हटले आहे, ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा यांनी दिलेल्या खबरीवरून मयत ९ वर्षीय मुलीला उपचारासाठी रुग्णालयात आणले़ मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली होती़ प्रारंभी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
पंचनामा करण्यासाठी नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात गेलो असता मयत मुलीच्या चुलत्याने तिला सर्पदंश झाल्याचे सांगितले. मात्र तपासणीत वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत्युबाबत संशय व्यक्त केल्याने पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी पंचनामा केला व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवला होता. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या अभिप्रायात मुलींच्या श्वसननलिकेवर कशाने तरी दबाव टाकून मृत्यू झाल्याचे सांगितले. या अहवालावरून खुनाचा गुन्हा दाखल केला़ चौकशी दरम्यान सोमवारी सायंकाळी तिच्याच आत्याच्या मुलाने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली़
मयत मुलीचे आई-वडील, मोठी बहीण व त्यांच्याकडे शिक्षणासाठी आलेला आतेभाऊ यांची आम्ही संशयित म्हणून चौकशी करत होतो. आतेभाऊ आप्पासाहेब नानासाहेब थोरात यानेच हा खून केल्याची कबुली दिली़ त्याला अटक करण्यात आली आहे़-डॉ़ दीपाली काळे, अपर पोलीस अधीक्षक
पोलिसांना दिला ३६ तास चकवारविवारी संबंधित मुलीचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करताना पोलिसांना संशय आला़ पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी रविवारी रात्री घटनास्थळ गाठून रात्री ११ वाजेपर्यंत तेथेच थांबून चौकशीला गती दिली़ सोमवारी सायंकाळी संशयित आप्पासाहेब थोरात याने एलसीबीच्या विशेष पथकाकडे गुन्हा कबूल केला. मात्र आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्यासाठी ३६ तास पोलिसांना झुलवले.
एक लाखाच्या आमिषाने फुटली खुनाला वाचामयत मुलगी ही सौंदाळा येथे शाळेत शिक्षण घेत होती. तिसरी पास होऊन ती या वर्षी चौथीच्या वर्गात जाणार होती. मृत्युनंतर तिचे आई-वडील व नातेवाईकांनी तिचा रविवारी सकाळी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी शाळेने तिचा राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेत एक लाखाचा विमा काढलेला आहे, तिचे शवविच्छेदन करून घ्या म्हणजे एक लाख रुपये मिळतील, असा सल्ला गावातील मंडळींनी दिला़ त्यामुळे अंत्यविधी रद्द करून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यामुळे एक लाखाचा विमा मिळेल, या आमिषानेच या प्रकरणाला वाचा फोडली आहे.