आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कोकजे वस्तीलगत प्रशांत कोंडलीकर यांच्या उसाच्या शेतात बुधवारी अंदाजे सव्वा दोन वर्षांची बिबट्याची मादी जेरबंद झाली. त्यामुळे परिसरातील शेतक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.आश्वी-दाढ खुर्द रस्त्यालगत उद्योजक कोंडलीकर याची वस्ती आहे. आठ दिवसांपूर्वी कोंडलीकराची जर्मन शेफर्ड जातीची कुत्री बिबट्याने ठार केली होती. त्याच सायंकाळी नारायण गिते यांची शेळी व दुस-या दिवशी कदम वस्तीवरील मेंढी व परिसरातील मोर, कुत्रे व कोल्हे यांना ठार करीत दहशत निर्माण केली होती. त्यामुळे प्रशांत कोंडलीकर यांनी वन विभागाला वेळोवेळी माहिती दिली होती. त्यानंतरही वन विभाग कारवाई करीत नसल्यामुळे हताश झालेल्या कोंडलीकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘आपले सरकार ’पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वन विभागाला खाडकन जाग येऊन कोंडलीकर यांच्या शेतात पिंजरा लावला होता.
नर बिबट्यासोबत दोन पिल्लेही परिसरात
मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भुकेने व्याकूळ झालेली सव्वादोन वर्षाची बिबट्याची मादी भक्ष्याच्या शोधात असताना पिंजºयात अलगद अडकली. या मादीबरोबर एक नर बिबट्या व दोन लहान पिल्लेही या परिसरात असल्याची चर्चा आहे. माय लेकरांची ताटातूट झाल्याने नर बिबट्या परिसरातील नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे. या परिसरात वन विभागाने आणखी पिंजरे लावून हा नर बिबट्या व पिल्ले जेरबंद करून ग्रामस्थांची बिबट्यांच्या दहशतीमधून सुटका करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.