अहमदनगर : छावणी सुरु करण्याच्या मागणीसाठी घोसपुरी येथील शेतक-याने आत्महत्या केल्यानंतर ग्रामस्थांसह शिवसैनिकांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. घोसपुरी येथील वसंत सदाशिव झरेकर यांनी आज सकाळी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.या आत्महत्येस महसूल प्रशासन जबाबदार असून या अधिका-यांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यत आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महसूल विभागाचा जबाबदार अधिकारी जोपर्यत येत नाही तोपर्यत मृतदेहाचे शवविच्छेदन न करण्यावर आंदोलक ठाम आहेत. दरम्यान विधानसभेचे उपसभापती विजय औटी, आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन आंदोलकांशी चर्चा केली. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे थोड्याच वेळात आंदोलकांची भेट घेणार आहेत.आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, छावणीचालक अशोक झरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.आत्महत्येस प्रशासन जबाबदार नाही - पाटीलदरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी याप्रकरणी प्रशासनाची भूमिका जाहीर केली आहे. संबंधित शेतक-याची जनावरे या छावणीत नव्हती किंवा यापूर्वी या शेतक-याने चारा छावणीची मागणीही केली नव्हती, त्यामुळे जिल्हा प्रशासन या आत्महत्येस जबाबदार नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी माध्यमांना दिली.
अधिका-यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही : आंदोलकांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 4:25 PM