अहमदनगर/ केडगाव : नगर तालुक्यातील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी होणारा ५२ वी अमरतिथी सोहळा ३०जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत समाधी दर्शनासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती अवतार मेहेरबाबा ट्रस्टने पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत डॉ.मेहेरनाथ कलचुरी म्हणाले, ३१ जानेवारी १९६९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले म्हणून या ठिकाणी लाखो भाविक येतात. त्यांच्या समाधी दर्शनासाठी अमरतिथीला देशाबाहेरून, देशभरातून हजारो मेहेरप्रेमी अमरतिथीला येत असतात. पण कोविडमुळे यावर्षी अमरतिथी उत्सव साजरा करण्यात येणार नाही. या तीन दिवसात होणारे कार्यक्रम हे सर्व रेकॉर्डिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने वर्च्युअल दृकश्राव्य पद्धतीने होणार आहे. कोरनाच्या सर्व सरकारी नियमांचे संपूर्ण पालन करून अमरतिथी उत्सव आपापल्या निवास्थानी साजरा करावा. अवतार मेहेरबाबा यांचे नामस्मरण करावे.
मेहेरबाद येथे संस्थेकडून कुठल्या प्रकारची निवासाची, खाण्या-पिण्याची व्यवस्था, दर्शन आधी सुविधा करण्यात येणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी. ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १२.१५ पर्यंत अवतार मेहेरबाबा यांच्या मौन कालावधीत प्रत्येक मेहर प्रेमींनी आपल्या निवासस्थानातून मौन धरावे. तीन दिवस येथे कुठल्याही प्रकारचे भजन, आरती, गायन, वादन, नृत्य इत्यादी कुठलाही कार्यक्रम होणार नाही याची नोंद घ्यावी. सर्व भाविकांनी संस्थेचे संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष श्रीधर केळकर, विश्वस्त मेहरनाथ कलचुरी, रमेश जंगले, जाल दस्तूर व सर्व विश्वस्त यांनी केले आहे.