नाशिक येथील लाचलुचपतची कारवाई
कोपरगाव : वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
आरोपीचे नाव भाऊसाहेब संपत सानप (वय ४४, रा. बालाजीनगर, संगमनेर) असे आहे. कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकात सानप कार्यरत होता. तालुक्यातील सुरेगाव येथे २७ मे रोजी या कर्मचाऱ्याने लाच मागितली होती. तेव्हापासून लाचलुचपत विभागाचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर लाच घेतल्याचे मान्य केल्याने त्याला पथकाने ताब्यात घेतले. सानप याने वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या एका इसमाकडून कारवाई टाळण्यासाठी ३० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर अखेर २० हजार रुपये घेण्याचे सानप याने मान्य केले. कोळपेवाडी साखर कारखान्याजवळ पोलिसावर कारवाई करण्यात आली. सोमवारी (दि.१४) सकाळी सहा वाजता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. ते याप्रकरणी तपास करत आहेत.
-------