अहमदनगर/राहुरी : मुळा धरणातून शेतीसाठी उजव्या कालव्यात सुरू असलेले आवर्तन बंद काळात देखील सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र शेतक-यांनी कालवा परिसरात गर्दी करू नये़. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी काम करणार नाहीत. परिणामी नाईलाजाने आर्वतन बंद करावे लागेल, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.कोराना विषाणू पाण्यातून वहात येऊ शकतो़. त्यामुळे शेतीसाठीचे आवर्तन बंद होऊ शकते, अशी अफवा मुळा लाभक्षेत्रात पसरली आहे. पाणी वापर सोसायटींकडून प्रशासनाला यासंदर्भात विचारणा होऊ लागली आहे. याबाबत मुळाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता बंद असला तरी जिल्हाधिका-यांनी आवर्तन सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे़. मात्र शेतकरी जमावाने कालव्यावर येऊन पाणी काढून नेत आहेत, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. शेतक-यांनी जमाव करू नये़ तसे केल्यास शेतक-यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. शेतक-यांना शेतीसाठी पाणी हवे असेल तर त्यांनी स्वयंशिस्त पाळलीच पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे़
शेतीला पाणी हवे असेल गर्दी टाळा; पाटबंधारे खात्याचे शेतक-यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:54 PM