अकोले : येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडून सभासद म्हणून आर्थिक गोष्टीच्या संबंधित कागदपत्रांची मागणी केली असता कारखाना प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी नेते दशरथ सावंत, बी. जे. देशमुख, मारुती भांगरे यांनी केला आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही ऊस उत्पादक सभासद असून ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, विविध कर्जासंबंधीची माहिती द्यावी, यासाठी कार्यकारी संचालक यांच्याकडे २६ नोव्हेंबर २०२० रोजी समक्ष मागणी केली होती. वारंवार पाठपुरावा करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सभासदांना ही माहिती देणे कायद्याने बंधनकारक असताना माहिती दिली जात नाही. त्यामुळे १० डिसेंबर २०२० पासून ही माहिती उपलब्ध होईपर्यंत कार्यकारी संचालक यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
..................
सर्व माहिती उपलब्ध आहे. कोरोना कालावधी असल्याने व उपाध्यक्ष यांचेसह काही संचालक कोरोनाशी लढा देत आहेत. संचालक मंडळाची बैठक झालेली नाही. बैठकीत मंजुरी घेऊन तात्काळ माहिती दिली जाईल.
- भास्करराव घुले, कार्यकारी संचालक, अगस्ती साखर कारखाना