केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव भागात विद्युत रोहित्र जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलण्याची कारवाई होताना महावितरण कंपनीकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच ग्रामीण भागातील जनतेला रात्र-रात्र अंधारात काढावी लागत आहे.
गुंडेगाव येथे विजेचा वापर वाढल्याने गावातील कुताळमळा, हराळमळा, चौधरीवाडी, धावडेवाडी सिंगल फेज व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करणारे रोहित्र कायम जळालेले पाहायला मिळत आहे. जळालेले रोहित्र दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करणारी यंत्रणा कासव गतीने काम करीत असल्याने विद्युत रोहित्रासाठी तब्बल महिनाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यासह ग्रामीण भागातील पिकांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने व विजेची मागणी वाढली असल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्रावर अधिकचा भार येऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
गुंडेगावामध्ये साधारण महिन्याला दोन, तीन रोहित्र जळालेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावातील जळालेले रोहित्र नगर येथून दुरुस्ती करून बसविण्यासाठी तब्बल महिनाभरापर्यंत वेळ जात असल्यामुळे व रोहित्र लवकर मिळत नसल्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे महावितरणने जळालेले रोहित्र तत्काळ बदलून देण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आगळे, त्रिदल सैनिक संघटनेचे भवानीप्रसाद चुंबळकर, प्रकाश भापकर पाटील, नागरिकांनी केली आहे.