कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असताना सरकारने कठोर निर्बंध लावले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य न समजलेल्या काही नागरिकांनी रस्त्यावर विना मास्क फिरून स्वतःबरोबरच इतरांच्या जीवालाही धोका पोहोचविण्याचे काम करीत आहेत. अशा लोकांवर लोणी पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत ७ हजार ५०० रुपये दंड आकारला. त्याचबरोबर काहींना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांचे प्रबोधन केले. लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी रविवारी काही नागरिकांना थेट पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगितले. पाटील म्हणाले, तुमच्यामुळे तुमचे कुटुंब आणि समाजातील अनेक नागरिक बाधित होऊ शकतात. पोलीस नागरिकांशी सौजन्याने वागत आहेत. पोलिसांच्या या सौजन्याचा गैरफायदा घेऊन इतरांचे जीव धोक्यात घालू नका. पोलिसांना कठोर भूमिका घेण्यास भाग पाडू नका. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या.
विनामास्क फिरणाऱ्यांना दंडासह प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:21 AM