केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे ८५० हेक्टरवर वनक्षेत्र आहे. बिबट्यासंदर्भात गुंडेगाव येथे वन विभागाने जनजागृती केली आहे. वन्यप्राण्यांच्या ठशांची ओळख व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सावधगिरीने कसे वागावे, असे सांगितले.
बिबट्या दिसल्यास त्याच्याजवळ जाऊ नका. अंधारात मुलांना एकटे सोडू नका. रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाताना मोठ्याने गाणी म्हणा किंवा बरोबर मोबाईलमध्ये गाणे मोठ्या आवाजाने वाजवा, असे गुंडेगावचे वनपाल अनिल गावडे यांनी सांगितले.
वनसंरक्षक सुनील पाटील म्हणाले, बिबट्या किंवा इतर संशयित वन्यप्राणी दिसल्यास त्वरित वन विभागाकडे संपर्क साधावा. तशा माहितीचे पत्रक लावले असून शेतकऱ्यांनी रात्री एकटे न जाता समूहाने जावे. बिबट्या दिसल्यास गावात दवंडी द्यावी.
यावेळी वन विभागाचे मनसिंग इंगळे, वन कर्मचारी रमेश शेळके, राम भोसले, कचरू शेळके, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, बबनराव हराळ पाटील, वामन जाधव, शहाजी भापकर, विठ्ठल हराळ, सोपान हराळ, वनमित्र संजय भापकर, समाजसेवक रामकृष्ण कुताळ आदी उपस्थित होते.