रत्नागिरी : पर्ससीन नेटबाबत शासनाने अद्याप निर्णय न दिल्यामुळे मासेमारी बंद आहे. केवळ पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू आहे. पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असते. पर्ससीन नेट बंदी अद्याप जारी असल्याने नौका मालकांनी जाळी वाळविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे.दरवर्षी १५ जून ते १५ आॅगस्टपर्यंत मासेमारी बंद करण्यात येते. माशांच्या प्रजननाचा कालावधी असल्याने मासेमारी बंद केली जाते. शिवाय पावसाळी वातावरण असल्याने वादळ, वारा यामुळे नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावल्या जातात. वास्तविक ९० दिवसांचा कालावधी अधिक असल्यामुळे मच्छीमारी संघटनांकडून ९०ऐवजी ६० दिवसांची मासेमारी बंदीची मागणी करण्यात आली आहे. परंतु पर्ससीन बंदी अद्याप जारी आहे. शिवाय पावसाळ्यातील मासेमारी बंदीस महिना शिल्लक राहिला आहे. पर्ससीनबाबत शासनाकडून निर्णय न झाल्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू आहे. पर्ससीनअभावी मत्स्य उत्पादनात घट झाल्याने आर्थिक उलाढाल ठप्प आहे. बाजारात माशांची आवक मंदावली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या नौकेला लागणारे इंधन, बर्फ, खलाशी पगार, शिवाय अन्य खर्चासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणातही मासे मिळत नाहीत. त्यामुळे काही मच्छिमारांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. काही मच्छीमार मालकांनी नौका किनाऱ्यावर लावण्यास प्रारंभ केला आहे. जाळ्या वाळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.जाळ्यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात असल्याने समुद्राच्या खाऱ्या पाण्याने जाळी खराब होतात. शिवाय गाळात अडकून जाळी फाटतात. पावसाळ्यातील दोन महिने मासेमारी बंद असल्यामुळे जाळ्या खराब होऊ नयेत, यासाठी ती गोड्या पाण्याने स्वच्छ धुवून वाळवून सुरक्षित ठेवण्यात येतात. शिवाय पावसाळ्यात जाळ्यांची दुरूस्तीदेखील करून घेण्यात येते. मोकळ्या मैदानात, रस्त्याच्या कडेला जाळ्या वाळत घालण्यात येत आहेत. पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्याने येणाऱ्या माशांची फर्माईश होऊ लागली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या माशांची किंमत अव्वाच्या सव्वा सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांकडून मात्र कालवी, मुळे यांना पसंती अधिक दर्शविली जात आहे. (प्रतिनिधी)
शंभर रुपये खर्चात निवडणूक जिंकणारा ‘अवलिया’
By admin | Published: May 02, 2016 11:19 PM