अहमदनगर : कोरोनावर पुदीना, ओवा आणि मॅनथॉलपासून बनविलेले आयुर्वेदिक औषध राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत सोमवारी (दि़.२५) घेण्यात आला. राज्यस्तरीय समिती हे औषध वापरात आणावे किंवा नाही, याचा निर्णय देणार आहे.
कोरोनावर लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अहमदनगर शहरातील रहिवासी बबन शिंदे यांनीही कोरोनावर औषध तयार केले आहे. ते त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे सादर केले. हे औषध घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो, असा शिंदे यांचा दावा आहे. जिल्हास्तरीय समितीने या औषधाच्या दोन बाटल्या राज्यस्तरीय समितीकडे पाठविल्या आहेत. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ़ तात्याराव लहाणे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने टास्कफोर्स समिती स्थापन केलेली आहे. या समितीसमोर विविध क्षेत्रातील व्यक्तींनी शोधलेल्या औषधांवर अभ्यास केला जातो. ही समिती शिंदे यांनी तयार केलेल्या औषधावर संशोधन करून पुढील निर्णय घेईल. या समितीच्या निर्णयानंतरच हे औषध कोरोनावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते किंवा नाही, ते ठरेल.
आजारावर लस तयार करताना त्याचा रुग्णांवर प्रयोग केला जातो. शिंदे यांनी तयार केलेले औषध उपयुक्त ठरल्यास त्याचा प्रयोग रुग्णांवर केला जाईल. तो यशस्वी झाल्यानंतरच हे औषध कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरता येणार आहे.
नगर शहरातील बबन शिंदे यांनी तयार केलेले औषध राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने घेतला असून, या समितीकडून काय निर्णय येतो, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल. - डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी तथा सदस्य जिल्हास्तरीय सल्लागार समिती.