चंद्रकांत शेळके, अहमदनगर : प्रारंभी केवळ दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना असलेली आयुष्मान भारत जनआरोग्य योजना आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याचे उद्दिष्ट १४ लाखांवरून ३१ लाखांवर गेले आहे. या ३१ लाखांपैकी आतापर्यंत ९ लाख ८४ हजार लाभार्थ्यांनीच आयुष्मान कार्ड काढले आहे.
केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. दुसरीकडे राज्यात महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येतच होती. आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असून, दोन्ही योजनांचे मिळून एकच आयुष्मान कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्यास या योजनेचा फायदा होणार आहे. सध्या या योजनेत अंत्योदय व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने केशरी शिधापत्रिकाधारकांनाही हे कार्ड मिळणार आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे १३ लाख ८२ हजार ६६२, तर महात्मा फुले योजनेचे १७ लाख ८२ हजार ४५३ लाभार्थी आहेत. असे एकूण ३१ लाख ६५ हजार १२४ लाभार्थ्यांना आता आयुष्मान कार्डचे वाटप आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.दोन्ही योजनांचे एकच कार्ड
आयुष्मान भारत व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे या दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ हा लाभार्थीला मिळणार आहे. ९९६ उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये, तर १२०९ उपचार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये आहेत.३१ टक्केच उद्दिष्ट पूर्ण
जिल्ह्यात एकूण ३१ लाख ६५ हजार लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटप करायचे आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ९ लाख ८४ हजार ४०७ कार्ड तयार झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत ३१ टक्के उद्दिष्ट पूर्ण असून, अजून ६९ टक्के कार्डनिर्मितीचे उद्दिष्ट गाठणे बाकी आहे.जिल्ह्यात ४३ रुग्णालयांत मिळणार उपचार
या योजनेअंतर्गत वर्षभरात एका कुटुंबास ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हा रुग्णालय व ४२ खासगी रुग्णालयांची निवड जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. त्यातील १४ खासगी रुग्णालये नगर शहरातील आहेत. हे कार्ड असेल तर कोणताही रुग्ण या खासगी रुग्णालयांत मोफत उपचार घेऊ शकतो.ऑनलाइनही काढता येईल आयुष्मान कार्ड
मोबाइलमध्ये आयुष्यमान ॲप डाउनलोड करा. त्यानंतर आधार फेस आरडी हे ॲपही डाउनलोड करा. आयुष्मान ॲपमध्ये बेनिफिशियरी लॉगिन पर्याय निवडा. मोबाइल ओटीपीद्वारे यात लॉगिन करता येईल. सर्च पर्याय निवडून आधार कार्ड क्रमांक किंवा रेशन कार्ड याद्वारे पात्र लाभार्थी यादी मिळेेल.त्यावर केवायसी पूर्ण करून कार्डला नोंदणी करता येते. पुढील काही दिवसांतच हे कार्ड तयार केल्याचा संदेश येईल. याशिवाय आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका किंवा ग्रामपंचायत योजनेतील रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्रांच्या मदतीने हे कार्ड काढता येते.जिल्ह्यातील आयुष्मान कार्डचा आढावा
पंतप्रधान जन आरोग्य योजना लाभार्थी : १३ लाख ८२ हजार ६७२महात्मा फुले जनआरोग्य लाभार्थी : १७ लाख ८२ हजार ४५३एकूण लाभार्थी : ३१ लाख ६५ हजार १२५आतापर्यंत आयुष्मान कार्ड वाटप : ९ लाख ८४ हजार ४०७ (३१ टक्के)कार्ड वाटप बाकी : २१ लाख ८० हजार ७१८ (६९ टक्के)