अहमदनगर : सय्यद मुस्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत ११० च्या रनरेटने धावा फटकावणारा नगरचा अष्टपैलू खेळाडू अझीम नझीर काझी याची महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे़ भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाच्यावतीने आयोजित विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला सामना २४ सप्टेंबर रोजी होणार आहे़ फेबु्रवारी-मार्च २०१९ मध्ये झालेल्या सय्यद मुस्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत काझीने महाराष्ट्राकडून खेळताना ११० च्या रनरेटने धावा फटकावल्या होत्या़ तसेच ६ विकेटही घेतल्या होत्या़ काझी डावखुरा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज आहे़ गुजरातविरुद्धच्या सामन्यात काझीने २९ चेंडूत उत्तुंग तीन षटकार ठोकत नाबाद ३९ धावा करुन महाराष्ट्राला विजय मिळवून दिला होता़ एकदिवसीय मालिकेत काझी प्रथमच खेळणार आहे़ काझी हा यापूर्वी महाराष्ट्राच्या १९ व २३ वर्षाखालील संघातून खेळला आहे़ फेबु्रवारीमध्ये त्याची महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात टी-२० स्पर्धेसाठी निवड झाली होती़ त्यानंतर आता तो एकदिवसीय मालिकेतून पदार्पण करीत आहे़ २५ वर्षीय काझी नगरमधील हुंडेकरी स्पोर्टस् अकॅडमीमध्ये सराव करीत आहे, अशी माहिती अकॅडमीचे प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाला यांनी दिली़
नगरचा अझीम काझी महाराष्ट्र क्रिकेट संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:03 PM