आम्ही टक्केवारीच्या भाषेत बोलतो. मृत्यूंची टक्केवारी इतक्या टक्क्यांनी कमी झाली वगैरे वगैरे, पण प्रत्येक मृत्यू हा शंभर टक्के असतो ना! त्यामुळे जाणारे मातृत्व शंभर टक्के जाते ना! टक्केवारी हे मानवी मनाला गुंगवण्याचे एक औषध वाटते. शेवटी ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हेच खरे आहे.
बहिरवाडीचे पाडेकर गेले. सुबत्ता सतना गेले. ते उद्योजक तर होतेच, पण एक प्रयोगशील शेतकरी होते. ते ग्रामसंस्कृतील ओरिजनल टॅलेंट होतं. जे केलं ते खेड्यात राहून केलं. साधेपणाने राहिले. डोक्यात हवा जाऊ दिली नाही. पायांनी जमीन कधी सोडली नाही.
माझं पाडकरांबाबतचं आकर्षण अलीकडचं. प्रवरा आढळा खोऱ्यांमध्ये बारा गाव पठार! या पठारावर पुन्हा डोंगर. अशाच एका मुथाळमेंच्या डोंगरावर पाडेकरांनी शेती घेतलेली. तेथील त्यांची साठ एकरांवरील पसरलेली फळबाग. शेती, जमिनीपासून दोन हजार फूट उंच. टाइमपास म्हणून तिथे गेलो.
डोंगरमाथ्यावर चौफेर फळझाडं, डाळिंब, चिक्कू, आंबा, मोसंबी, बोर.. अविश्वसनीय! त्यानंतर एका भगीरथाची ढगातील शेती म्हणून वृत्तपत्रात मी लेख लिहिला. होय तो भगीरथच ! पुराण--- भगीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली. याने तरंगणाऱ्या ढगातील गंगा डोंगरमाथ्यावर उतरवली. हाच तो काय फरक ! पुराणातल्या भगीरथाकडे मंत्र-तंत्र तरी होते! याच्याकडे काय होतं ! होता केवळ घाम ! रक्ताचे थेंब ! त्याचे वर्णन शब्दांचे काम नव्हते ! केवळ डोळ्यांनी पहावे असे.
त्या माझ्या लेखाला मोठा पुरस्कार मिळाला, कारण त्यात पर्यावरणाच्या मोठ्या प्रश्नाला एक छोटे उत्तर होते. असा तो प्रयोग आणि एक लेखक-पत्रकार म्हणून पाडेकर हे एक आकर्षक बिंदू ठरले.
मला कायम वाटत आलं. ‘ढगारल्या शेतीला महाराष्ट्रातील कुणी धोरणकर्ते, वरिष्ठ अंमलदार, टॅलेंट यांनी भेट द्यावी, पण तसेही फारसे झाले नाही. भगीरथ प्रयत्न म्हणजे काय याच्या दर्शनासाठी तरुण पिढ्यांनी तिकडे भेट द्यायला हवी, पण झाले असे की, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत जेवढा भास देता येईल तेच नको ते काम केल गेलं. मला ती एक विकृती वाटली, कारण तिथे महाराष्ट्राच्या एका जटिल प्रश्नाला उत्तर देण्याचा एक प्रयोग चालू होता. याचे भान कुणाच्या गावीही नव्हते. ‘आवळावाला’ बबन पाडेकर नावाचं मातीतून उठवलेले एक खरे-खुरे टॅलेंट पुन: काल मातीमग्न झाले आहे.
-शांताराम गजे
-------