अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्यावर शनिवारी (दि.२८) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गृहविभागाच्यावतीने पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून ढाकणे यांना मानवंदना दिली. शासनाच्यावतीने मंत्री धनंजय मुंढे यावेळी उपस्थित होते. बबनराव ढाकणे अमर रहे, परत या परत या, अशा घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमून गेला. ढाकणे हे निमोनियामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून आजारी होते. गुरुवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर ढाकणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये ठेवण्यात आले. शनिवारी दुपारी १२.३० वाजता सजविलेल्या रथातून पाथर्डी शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपूत्र प्रतापराव ढाकणे यांनी अग्नी दिला. बबनराव ढाकणे अमर रहे, परत या परत या अशा जोरदार घोषणांनी यावेळी आसमंत दुमदुमून गेला. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. शासनाच्यावतीने मंत्री धनंजय मुंढे, खासदार डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यासह आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ढाकणे यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आमदार मोनिका राजळे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, बबनराव पाचपुते, सुरेश धस, माजी मंत्री पंडित दौंडी, नरेंद्र घुले, भिमराव धोंडे, चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, साहेबराव दरेकर, केशवराव आंधळे, रामकृष्ण बांगर, विठ्ठल महाराज, रामकृष्ण महाराज, हर्षदा काकडे, प्रदुषण आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, प्रांतधिकारी प्रसाद मते, पोलिस उपअधीक्षक सुनिल पाटील, तहसिलदार शाम वाडकर, विजय गोल्हार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, सुशिला मोराळे, मोहटा देवस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, संतोष भारती महाराज, दादा महाराज नगरकर, सी. डी. फकीर, पांडुरंग अभंग, राजेंद्र फाळके, विठ्ठल लंघे, अभिषेक कळमकर, रामदास गोल्हार, योगिता राजळे, संदीप वर्पे, राधाताई सानप, अश्विनीकुमार घोळवे यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.