अहमदनगर : धुळवड म्हणजे रंगाचा खेळ. एकमेकांवर रंगांची मुक्त उधळण करुन साजरा केला जाणारा हा संण ‘बबन’ सिनेमातील टिमने एका आगळ्या-वेगळ्या ढंगात साजरा केला. श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे गावात चिखलाच्या रंगात रंगण्याचा रंगाची अनोखी ‘धुळवड’ ‘बबन’ च्या टीमने साजरी केली. विशेष म्हणजे यात अनेक प्रेमीयुगालांनी सहभाग घेतला.आतापर्यंत आपण नैसर्गिक रंग लावून खेळल्या गेलेल्या इकोफ्रेण्डली रंगपंचमीच्या बातम्या वाचल्या असतील. पण चक्क चिखलात माखून रंगपंचमी खेळण्याची ही ‘बबन’च्या टीमने सुरु केलेली प्रथा अनोखीच. ‘बबन’च्या टीमसोबत या अनोख्या धूळवडीचा स्थानिक नागरिकांनीही मनसोक्त आनंद लुटला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘ख्वाडा’फेम दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या मोशन आणि टीझर पोस्टरवर दोन प्रेमीयुगुल चिखलाने माखले असल्याचे दिसून येते. याचाच संदर्भ घेत म्हसे गावात अनेक प्रेमी जोडप्यांना घेऊन चिखलातील अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे म्हणाले, महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असून, शेतक-याला येथे महत्वाचे स्थान आहे. शिवाय प्रत्येक शेतक-याची नाळ आपल्या मातीशी जुळलेली असते. गावच्या मातीच्या रंगाची आणि सुगंधाची तोड इतर कोणत्याही रंगात नसल्यामुळे, आपल्या मातीशी एकरूप होण्यासाठी अशी इतरांहून वेगळी ‘धुळवड’ साजरी करण्याचे आम्ही ठरवले.चिखलात रंगपंचमी खेळण्याची म्हसे गावक-यांची प्रथा आहे. ही प्रथा सर्वदूर पोहोचविण्याचाही ‘बबन’ टीमचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. धुळवडीच्या या अनोख्या पद्धतीबरोबरच पारंपारिक ‘होळी’ पेटविण्याच्या कार्यक्रमातही झाला. लेझीमच्या तालावर ठेका धरीत म्हसे ग्रामस्थांनी या होळीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
म्हसे गावात चिखलाच्या रंगात रंगली ‘बबन’ची टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 7:01 PM