अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील पाणीपट्टीत सुमारे एक हजार रुपयांनी दरवाढीची शिफारस केली आहे. याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने तेलीखुंट चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी रिकामे हंडे घेवून सहभाग घेतला. पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, जेवढे दिवस नळाला पाणी येते, तेवढ्याच दिवसांची पाणीपट्टी आकारण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव ढोणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुबीन शेख, गणेश भोसले, अमित चव्हाण, मयुर पाटोळे, सागर आडसुळ, पप्पू साळवे, मयुर उन्हाळे आदींनी सहभाग घेतला़ युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात चार ते पाच वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा चालू आहे. ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारुन १५० दिवसांचेच पाणी देण्यात येते. याप्रमाणे पाणीपट्टी देखील १५० दिवसांचीच आकारण्यात यावी. पाणी पुरवठा योजनेचा खर्च व उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी पाणीपट्टी वाढ हा पर्याय नसून, शहरातील बेकायदा नळ कनेक्शन शोधणे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, बोगस नळ कनेक्शन नियमीत करावेत, पाणी पुरवठा व्यवस्थेचे वॉटर आॅडिट करावे, बेकायदा व बोगस नळ कनेक्शनला जबाबदार असणा-या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिका-यांवर आयुक्तांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. पाणीपट्टीतील प्रस्तावित दरवाढ मागे घेऊन नगरकरांना सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
पाणीपट्टी दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे नगर महापालिकेत बोंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 6:02 PM