रेखा जरे खून प्रकरणात बोठे हा पोलिसांना सापडत नाही. पोलीस प्रशासनात असलेल्या संबंधामुळे त्याला लाभ होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला असता मनोज पाटील यांनी पोलिसांकडे बोठेविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला निश्चितच अटक होईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांनी उभारलेल्या बेकायदा पोलीस चौकी प्रकरणात न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले का असे मनोज पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल. जिल्ह्यात पुढील काळात गुन्ह्यांच्या आकडेवारीत वाढ होईल. गुन्हे दाखल झाल्यानंतरच त्यांची उकल होते. पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची आकडेवारी कमी करण्याचे प्रयत्न होणार नाहीत, असे मनोज पाटील म्हणाले. किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये विनाकारण अटक केली जाणार नाही. सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यात मात्र अटकेची कारवाई केली जाईल. यासंबंधी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिल्याचे ते म्हणाले.
-------
अपघातांतील वाहने ठाण्यात नको
अपघातांमधील वाहने पोलीस ठाण्यांमध्ये जमा करू नयेत, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी केल्यानंतर अपघातातील वाहनांचा पंचनामे करून संबंधितांच्या ताब्यात द्यावीत, असे पाटील म्हणाले.
--------
दूध भेसळची गंभीर दखल
जिल्ह्यात श्रीरामपूर, राहुरी येथे दूध भेसळीचे काही प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हे गुन्हे आहेत. त्यात अन्न व औषध प्रशासनाला सहभागी करून घ्यावे. त्यांची मदत घ्यावी, असे आदेश मनोज पाटील यांनी दिले.