आॅनलाइन लोकमतश्रीरामपूर (अहमदनगर) दि़१९- आसूड यात्रा सभा संपल्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूरच्या पाटबंधारे कार्यालयाच्या भिंतीला व अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना काळे फासले. घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी घडली होती. शहर पोलीस ठाण्यात मात्र रात्री ११ वाजता सरकारी कामात व्यत्यय आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आ.बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह प्रहार संघटनेच्या ३५ कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.शेतीला पाणी मिळाल्याशिवाय प्रवरा कालव्याचे आवर्तन बंद करणार नाही, असे आश्वासन पाटबंधारे अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले होते. पण नेवाशाच्या आमदारांच्या दबावाखाली अचानक आवर्तन बंद केल्याने शेतीचे भरणे राहिल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी हातात रॉकेलच्या बाटल्या घेत पाटबंधारे कार्यालयात आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे कार्यालयाच्या कारभाराविरोधात प्रहार संघटनेचे व आसूड यात्रेचे कार्यकर्ते पाटबंधारे कार्यालयात मंगळवारी दुपारी १२ वाजता घुसले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक शेतकऱ्यांना पाहून कार्यालयाबाहेर पळ काढला होता. यावेळी आ.बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, अजय महाराज, कालिदास महाराज, बाळासाहेब पटारे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी खुर्च्यांना काळे फासल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव व निरीक्षक प्रवीण लोखंडे घटनास्थळी आले होते.काळे फासल्याप्रकरणी दिलीप चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आ.बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह प्रहार संघटनेचे ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच कालिदास पटेल,अजय महाराज, बारस्कर महाराज,युवराज जगताप, बाळासाहेब पटारे, अनिल औताडे(माळेवाडी), शंकरराव मुठे, भास्कर शिंदे, विलास कदम व अन्य ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुध्द गैरकायद्याची मंडळी जमवून पाटबंधारे कार्यालयात गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणला. अभियंता दादासाहेब खोसे यांच्या कार्यालयात जाऊन फलक तोडून टेबल खुर्च्यांना काळे फासले, मालमत्तेचे नुकसान केले या कारणावरुन गुन्हा नोंदविण्यात आला.
बच्चू कडू, रघुनाथदादांवर गुन्हा दाखल
By admin | Published: April 19, 2017 7:40 PM