कोपरगाव : महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील १५ टक्के पिण्यासाठी व १० टक्के औद्योगिकीकरणासाठी तर उर्वरीत ७५ टक्के पाणी सिंचनासाठी आरक्षीत आहे. पण, निळवंडे धरणाचे पाणी कोपरगावला मिळणार असल्याने बदमाश राष्ट्रवादीवाले उगाचच जनतेला भडकावून बुध्दीभेद करीत आहेत, अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गुरूवारी रात्री पालिकेतील भाजप-सेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची शिवतारे यांच्याशी शिर्डी विश्रामगृहावर भेट घेऊन शहराला निळवंडेतुन पिण्याच्या पाण्याची योजनेसंदर्भात चर्चा घडवून आणली. यावेळी शिवतारे म्हणाले, २००३ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्व धरणांवर सम प्रमाणात पाण्याचे आरक्षण टाकण्याचा निर्णय झाला. पण, शासन निर्णय काढला गेला नाही.आपण मोठे उद्योग आणून एम.आय.डी.सी. करण्याची सूचना केली होती. थेट एम.आय.डी.सी. द्यायला मी काही उद्योगमंत्री नाही. रोजगाराची गरज असल्यास तुम्ही एकत्र येऊन जागा उपलब्ध करून द्या, मी मंजुरी आणून देतो, असे म्हटल्याचा विपर्यास झाल्याचे सांगत शिवतारे यांनी शिवसेना नेत्यांनाच घरचा आहेर दिला. यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, उनगराध्यक्ष विजय वाजे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख असलम शेख, संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, नगरसेवक रवींद्र पाठक, स्वप्नील निखाडे, शिवाजी खांडेकर, अनिल आव्हाड, सत्येन मुंदडा आदी उपस्थित होते.
योजना व्यासपीठावर होत नसतातसांगलीचे पाणी लातुरला, उजनीचे पाणी उस्मानाबादला देता येते. मग, निळवंडेचे पाणी कोपरगावला का नाही? शिर्डी संस्थानने दिलेल्या ५०० कोटीच्या निधीतुन निळवंडेहून शिर्डीपर्यंत पाईपलाइनची पहिली योजना होती. तेथून पुढे कोपरगावला पिण्याच्या पाण्यासाठी आपण मंजुरी दिली. या कामासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे चालता येत नसूनही दोनदा माझ्याकडे आले. त्यांचे आभार सर्वांनी मानले पाहिजे. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे. पण, कुणीतरी चुकीच्या माहितीवर अजित पवार यांनी पाईपलाइनला एका कार्यक्रमात व्यासपीठावर मंजुरी दिल्याचे पत्रकारांना चुकीचे सांगितले. योजना व्यासपीठावर होत नसतात, त्यांना विधानसभेत मंजुरी घ्यावी लागते.-विजय शिवतारे, राज्यमंत्री