संगमनेर : संगमनेर नगर परिषदेने शहरात ‘व्हर्टिकल गार्डन’चा प्रयोग राबविला आहे. बसस्थानकासमोर भक्कम लोखंडी जाळीला वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था करून त्यात कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कुंड्यांमध्ये रोपटे देखील विशेष पद्धतीनेच लावली आहेत. असे असताना मालाची विक्री होण्यासाठी दिल्लीहून बॅगा घेऊन संगमनेरात विक्रीसाठी आलेल्या एका बॅग विक्रेत्याने व्यवसायासाठी मोक्याची जागा शोधली आहे. लोखंडी जाळीला बॅगा अडकवून विक्री सुरू आहे. त्याने केलेल्या प्रयोगाकडे संगमनेर नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. १६४ वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या संगमनेर नगरपरिषदेने शहरातील वाहनतळासंदर्भात अद्याप कुठलेही धोरण ठरविलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने लावली जातात. सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था सुरू होण्यापूर्वीच बंद आहे. अनेक ठिकाणी त्यावरील दिवे देखील गायब आहेत. शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. संगमनेर नगर परिषदेने बसस्थानकासमोर ‘व्हर्टिकल गार्डन’ शेजारी सूचना फलक लावला होता. परंतू तो फलकही आता तेथे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी पालिकेने शहरातील फलक काढण्याची मोहीम हाती घेतली. परंतू पुन्हा फलक लागायला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी फेरीवालेही वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभे असतात. त्या संदर्भातही पालिकेने धोरण ठरविणे गरजेचे आहे.
संगमनेरात ‘व्हर्टिकल गार्डन’ला लटकल्या दिल्लीच्या बॅगा
By शेखर पानसरे | Published: June 08, 2024 3:11 PM