अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याला रविवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जरे हत्याकांडात अटकेत असलेला बोठे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात चौकशीसाठी त्याला वर्ग करून घेतले होते. शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी पारनेर न्यायालय व जिल्हा न्यायालयात अर्ज करून बोठे याची खंडणीच्या गुन्ह्यात चौकशी करावयाची असल्याने त्याला वर्ग करुन घेतले. तोफखाना पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर २०२० रोजी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बोठे याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.