मागील महिन्यात नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची तपासणी केली होती. या वेळी कारागृहातील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश नीलेश कर्डिले यांच्याकडे दोन मोबाइल आढळून आले होते. कारागृहात आरोपींना जेवण देणारे सुभाष लोंढे, प्रवीण देशमुख (रा. सुपा, ता. पारनेर) यांनी हे मोबाईल आरोपींना दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. या वेळी पारनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र ज्या बराकीतील आरोपींकडे मोबाइल सापडले तेथे बाळ बोठे यालाही ठेवण्यात आले होते. त्यामुळे बोठे यानेही त्या मोबाइलचा वापर केल्याचा संशय पोलिसांना होता. वापरलेल्या मोबाइल नंबरचे पोलिसांनी सीडीआर काढल्यानंतर बोठे यानेही या मोबाइलचा वापर केल्याचे समोर आले. त्यामुळे बोठे याला आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. मोबाइल देणारे व वापरणारे अशा एकूण आठ जणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बळप हे पुढील तपास करत आहेत.
.......
बोठे याने कुणाला केले फोन?
कारागृहात चोरून मोबाइलचा वापर करणाऱ्या बोठे याने कुणाला फोन केले होते, याचा सविस्तर तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बोठे हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्याने ज्यांना फोन केले त्यांचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.