अहमदनगर : महापौर निवडणुकीसाठी सेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी पाठिंबा मागितला, त्यानुसारच आपण सेनेला मतदान केले, असा खुलासा शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम याने पत्रकारांशी बोलताना केला आहे. महापौर निवडणुकीदरम्यान छिंदम याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान केले. त्यामुळे सभागृहात छिंदम याला मारहाण झाली. छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. तो कोणाला मतदान करणार याची उत्सुकता होती. त्याने सेनेने उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली.छिंदम म्हणाला, बाळासाहेब बोराटे यांनी मला मतदान करण्याची विनंती केली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मतदान करण्यास सांगितले. त्या सर्वांचे कॉल रेकॉर्डिंग आहे. सभागृहात मतदानावेळी मी बोराटे यांना मतदान करत असताना मला रोखण्यात आले. माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. हात उचलणारे नगरसेवक पळकुटे आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे छिंदम याने सांगितले. शिवसेनेकडून माझ्या जिवितास धोका असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.