शिर्डी : सहकारी पतसंस्थांनी नागरिकांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणला आहे. पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात रुजली आहे. त्यामुळे सहकारी पतसंस्थांनी नियमांचे पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असे मत राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि.१५) येथे केले. सहकार विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथील राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सहकार प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्रातील नागरी, पगारदार, महिला, ग्रामीण बिगरशेती, मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार संवाद व मेळावा झाला. मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या सहकार संवाद मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इलेनिता सँड्रॉक, नेपाळच्या सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष परितोष पौडयाल, नॅफकॅबचे अध्यक्ष उदय जोशी, कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बी. एच. कृष्णारेड्डी, राज्याचे अप्पर निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे, नाशिकच्या सहकारी संस्था विभागीय सहनिबंधक श्रीमती ज्योती लाटकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उषाताई तनपुरे, सहकार भारतीचे मुकुंद तापकीर, बुलडाणा अर्बनचे संचालक मुकुंद झवर उपस्थित होते.विविध देशांतील व राज्यातील सहकारी पतसंस्थाविषयक कायदे व सहकारी पतसंस्थांची कार्यपध्दती या विषयांवर या परिषदेच्या पहिल्या सत्रात चर्चा करण्यात आली. काकासाहेब कोयटे यांनी प्रास्ताविक केले. राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजूदास जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शासन पतसंस्थांच्या पाठिशीनिकोप वाढीसाठी सहकारी पतसंस्थांनी सवंग लोकप्रियता आणि व्याज दरातील स्पर्धा टाळावी. सकारात्मक बदल करावा. युवकांनी सहकार चळवळीत सहभागी व्हावे यासाठी, सहकारी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा. राज्य शासन पतसंस्थांच्या पाठीशी असून सहकारी पतसंस्थांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक आहे, असेही बाळासाहेब पाटील म्हणाले.
सहकारी पतसंस्थांनी पारदर्शक कारभार करावा-बाळासाहेब पाटील; शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार संवाद व मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:12 PM