संगमनेर - 'आम्ही ज्येष्ठ नेते म्हणून पिचडांचा कायमच आदर केला, मात्र निळवंडे कालव्यांच्या संदर्भाने त्यांनी घेतलेली दुराग्रही भूमिका चुकीची आहे. आगोदरच शासकीय अनास्थेमुळे पाच वर्षे रखडलेल्या कालव्यांना पिचडांनी राजकीय हेतूने विरोध करू नये, याप्रकरणी दुष्काळी जनतेच्या भावना तीव्र आहे, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रक प्रसिद्ध करून निळवंडे कालव्यांसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. चार दिवसांपूर्वीच थोरात यांनी अकोलेकरांना विरोध सोडण्याचे आवाहन केले होते.
आमदार थोरात म्हणाले, 'भूमिगत कालवे होणारच नाही, त्यासंदर्भातील भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केली आहे, त्यामुळे आकोल्यातून सुरू असलेला विरोध हा राजकीय भावनेतून सुरू आहे. निळवंडे प्रकल्पच मुळात दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी उभारला गेला आहे. सन 1991 पासून निळवंडे प्रकल्पासाठी अकोले आणि संगमनेरने एकत्रित प्रयत्न केले आहेत, असे असतांना अकोले तालुक्यात होणाऱ्या कालव्यांना विरोध करून पिचड चुकीचे वागत आहे.
'निळवंडे कालवे हे दुष्काळी भागाच्या भावनेचा विषय आहे आणि तेथील जनतेच्या भावना तीव्र आहे. हात तोंडाशी आलेला पाण्याचा घास हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. दुष्काळी भागातील जनता उद्रेकाच्या तयारीत आहे, त्यामुळे अकोले येथून सुरू असलेले कालव्यांचे राजकारण बंद करावे.' असेही थोरात म्हणाले.