काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी-बाळासाहेब थोरात; खासदारही देणार पंतप्रधान सहाय्यता निधीला वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 01:13 PM2020-03-30T13:13:46+5:302020-03-30T13:15:24+5:30
काँग्रेसने संकटकाळात नेहमीच पुढे राहिली आहे. सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
संगमनेर : कोरोनाचे संकट गंभीर असून त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे. काँग्रेसने संकटकाळात नेहमीच पुढे राहिली आहे. सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. सरकारी पातळीवरून सर्व प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे सरकार योग्य नियोजन करीत आहे. अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती, तसेच व्यक्तीगत पातळीवरूनही सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत. काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशहिताला व नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्व आमदार व खासदारांनी एक महिन्याचे वेतन मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोलीस यंत्रणा, आरोग्य तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी दूत म्हणून अहोरात्र काम करीत आहेत. जनसेवेच्या मदतीसाठी हे उल्लेखनीय ठरत आहे. त्या सर्वांचे कौतुक करावे वाटते.
काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याची इच्छा आहे. त्यांनी, महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या स्वतंत्र बँक खात्यात आपली मदत जमा करावी, असे आवाहन मंत्री थोरात यांनी केले आहे.