संगमनेर : तिरूपती बालाजी मंदिर सुरू होणार असेल तसा विचार आपल्यालाही करावा लागणार आहे. परंतू एकंदर आजच्या परिस्थितीचा सर्वसमावेशक विचार करून उच्चस्तरीय पातळीवर चर्चा होवून राज्यातील देवस्थानांबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (६ जून) पत्रकारांशी मंत्री थोरात बोलत होते. निर्सग चक्रीवादळाने राज्यात नुकसान झाले. कोकणातील काही तालुक्यांमध्ये खूपच मोठे नुकसान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तेथे भेट दिली आहे.
सह्याद्री पर्वत रांगाच्या पलीकडील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांमध्येही नुकसान आहे. या सर्वांचे पंचमाने लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत हे काम पूर्ण होईल. रायगड जिल्ह्यामधील जे नुकसान झालेले आहे. त्यात मुरूड, श्रीवर्धन, आलिबागमधील नुकसानीचे स्वरूप मोठे आहे. त्यामुळे तिथे काही वेगळे निर्णय घेणे अपेक्षित होते. ते मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत, असेही थोरात यांनी सांगितले. कोरोनाचे संकट कसे कमी होईल याचीच काळजी केली जात आहे, असेही ते म्हणाले.