संगमनेर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वागण्यातील सहजता, सर्वांना समावून घेण्याची कार्यपध्दती तसेच कोणतेही राजकीय डावपेच न वापरता त्यांनी घेतलेले विकासाचे निर्णय यामुळे ते लोकप्रिय आणि यशस्वी ठरत आहेत. तरूणांनी राजकारणात काम करताना जिद्द, प्रामाणिकपणा ठेवावा. असलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडल्यास यश नक्की मिळेल, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित छत्रपती यूथ फेस्टिवलमध्ये महाराष्टÑ दिनी महसूलमंत्री थोरात यांनी शुक्रवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंंगद्वारे साधला संवाद साधला. ते म्हणाले, आपण कायमच राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित असा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे. तरूणांनी स्वत:च्या जीवनात सकारात्मकता वाढवताना असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास जीवनात यश नक्की मिळेल. माझ्या ३५ वर्षांच्या काळात १२ वेगवेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचे काम पाहण्याची, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्य वेगळे होते. त्यांनी आपापल्यापरीने महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले. आपल्या जीवनात संयम, प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा व आहे ती जबाबदारी पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडायची हेच यशाचे गमक आहे. कोरोनामुळे राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन असताना जनतेने केलेले सहकार्य मोलाचे असून प्रशासन सरकार व कोरोना वॉरियर्स यांचे काम कौतुकास्पद राहिले आहे, असे थोरात म्हणाले़
बाळासाहेब थोरात म्हणतात..मुख्यमंत्र्यांचे निर्णय राजकारणविरहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 12:10 PM