अहमदनगर: महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. तसेच वेळोवेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांमधील नेतेही एकमेकांवर टीका करतानाही पाहायला मिळाले. यातच आता काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावलर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस तुम्ही शरद पवारांचा आधार घेणार, अशी खोचक विचारणाही थोरात यांनी केली.
श्रीगोंदा येथील माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला कोटी करत टोला लगावला.
राष्ट्रवादीने आता पवारांवर जास्त हक्क सांगू नये
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार केंद्रात कृषीमंत्री होते, तेव्हा मी राज्यात कृषीमंत्रीपद मागून घेतले होते. कारण, केंद्रात शरद पवार असल्यामुळे राज्यात काही कमी पडणार नाही, हे मला माहिती होते. मला शेजारी बसवून ते संपूर्ण राज्यातील कृषी मंत्र्यांशी चर्चा करायचे. कारण मला शेतीतील समजावे हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आता शरद पवारांवर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस शरद पवारांचा तुम्ही आधार घेणार, असा मिश्लिक टोला थोरातांनी लगावला.
श्रीगोंदा हा संपन्न तालुका
अहमदनगर जिल्हा खूप मोठा आहे. तीनशे किलोमीटर लांबी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अनेक नेत्यांनी एक ठेवले. कोण मोडत असेल तर त्याला उभे करणारी माणसे नगर जिल्ह्यात होती. श्रीगोंदा तालुका हा संपन्न तालुका आहे. या तालुक्याइतके पुढारी आणि कार्यकर्ते कुठेही नसतील. कुकडीचे पाणी हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे. जयंत पाटील साहेब तुमचे आभार, तुम्ही हा प्रश्न मान्य केला, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुष्काळ पाहण्यासाठी इंदिरा गांधी आणि पंडित नेहरु आले होते. पण आता पाणी आले आहे, परिस्थितीत बदलली आहे. नगर जिल्ह्यात खूप जागृती असते. पाण्याच्या प्रश्नावरुन या जिल्ह्यात खूप वाद व्हायचे. इथे लग्नानंतर भाषणे करायची पद्धत होती आणि त्या भाषणात लग्न लागल्यानंतर पाण्यावरुन भाषणे व्हायची, असा किस्सा सांगत साखर उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. आता आपण वीज आणि इथेनॉल साखर कारखान्यात तयार करतो. इथेनॉलपेक्षा एक नवीन पदार्थी हायड्रोयजन आला आहे. त्यावर आमचा अभ्यास सुरु आहे. ते जर सुरु झालं तर शेतकऱ्यांना टनामागे जास्त पैसे मिळतील. वीज आणि इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना दीडशे ते दोनशे रुपये जास्त मिळणार आहेत, असे शरद पवार म्हणाले.