लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी ( दि.१३) मतदान होते आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८७ टक्के इतके मतदान झाले.
काँग्रेस नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत संगमनेर तालुक्यातील त्यांच्या जोर्वे गावात मतदान केले. आमदार थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात, कन्या कर्करोग तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, बंधू इंद्रजीत थोरात, आरती थोरात आदींनी मतदान केले. 'लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक आहे. या उत्सवात आज सहकुटुंब सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला आपणही मोठ्या संख्येने मतदान करा आणि लोकशाही समृद्ध करा' असे आवाहन आमदार थोरात यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी अकोले शहरातील मराठी शाळेत मतदान केले. त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले.