लोणी (जि. अहमदनगर): माझ्या बदनामीचे षड्यंत्र असून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही आमच्या सुखदु:खाची चिंता करणारे मंत्री बाळासाहेब थोरातच दोन वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे यांनी केला. त्यासाठी त्यांनी दिल्लीत कोणाच्या भेटी घेतल्या त्यांची नावे आम्हाला जाहीर करायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला. माध्यमांशी बोलतांना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या न झालेल्या भेटीची चर्चा जाणीवपूर्वक सुरु करुन मला बदनाम करण्याचा काहींचा हेतू आहे. या बदनामीकारक चर्चेच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. पक्षाला मिळालेल्या यशात थोरातांचे कर्तृत्व शून्य आहे. त्यांना सर्व अपघाताने मिळाले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यात काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मागील साडेचार वर्षे थोरात गायबच होते.
काँग्रेसचा राज्यात पूर्णपणे फुटबॉल झाला असून, काँग्रेसचे नेतृत्व राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दावणीला बांधले आहे. महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेतून राज्यातील शेतक-यांची फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल वेगळाच असल्याने स्वत:च्या भूमिकेपासून ते दूर गेल्याने त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या मदतीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही काही बोलायला तयार नाहीत.
जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाचजिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल. त्यासाठी कोणता पॅटर्न वापरायचा ते वापरु. पण ३१ डिसेंबरला नवा पॅटर्न दिसेल आणि उमेदवार कोण असेल हेही ३१ डिसेंबरलाच जाहीर करु, असे माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड ३१ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीनंतर विखे म्हणाले, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच करण्याची जबाबदारी वरिष्ठांनी आमच्यावर सोपवली आहे. त्यासंबंधी चर्चा झाली असून, उमेदवार ३१ डिसेंबरला जाहीर होईल. कोणता पॅटर्न वापरायचा तो वापरु पण अध्यक्ष भाजपाचाच करु.