अहमदनगर : शहरात कोविड लसीकरण सुरू असून, सर्वच केंद्रांवर लसीची मात्रा घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेने बोल्हेगाव, केडगाव व इतर ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र आणि उपकेंद्र सुरू केले आहेत. याच अनुषंगाने बालिकाश्रम रोड परिसरातही स्वतंत्र लसीकरण केंद्र अथवा उपकेंद्र सुरू करण्याची मागणी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कावळे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बालिकाश्रम रोड परिसर मोठ्या लोकवस्तीचा भाग आहे. वाघमळा, बडोदा कॉलनी, कवडेनगर, जाधव मळा, सुडके मळा , चिंतामणी हॉस्पिटल परिसर, लेंडकर मळा, सिद्धार्थनगर या भागात मोठी लोकवस्ती आहे. या परिसरातील नागरिक सातत्याने स्वतंत्र लसीकरण केंद्रासाठी आग्रही आहेत. या परिसरातील नागरिकांना सध्या लसीकरणासाठी लांब अंतरावर जावे लागते. लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू आहे, अशा परिस्थितीत दूर अंतरावर जाणे जिकिरीचे होते. याशिवाय वयोवृध्द, ज्येष्ठ नागरिकांना दूर अंतरावरील लसीकरण केंद्रावर नेताना अडचणी येतात. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी बालिकाश्रम रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे.