श्रीगोंदा : बाळूमामांच्या पालखीतील मेढरं शेतकऱ्यांच्या शेतातील पीक आणि गवतावर ताव मारतात, तर दुसरीकडे मात्र बाळूमामांचे भक्त असलेल्या हजारो मेंढपाळांना मेढरं जगविण्यासाठी डोंगरदऱ्यात, माळरानावर वणवण भटकावे लागत आहे. अंधारात लेकरंबाळे घेऊन राहावे लागते. त्यातूनही मेंढरांना कितीसे खाद्य मिळते हा प्रश्न आहे. बाळूमामांची मेंढरं तुपाशी, तर त्यांच्या भक्तांची मेंढरं उपाशी, अशी विदारक अवस्था पाहावयास मिळत आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी श्रीगोंदा शहरात बाळूमामांच्या मेंढरांचे पालखीसह वाजत गाजत आगमन झाले. पालखी आणि मेंढरांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. जेवणावळी आणि डीजेच्या गगनभेदी आवाजात जेसीबीने भंडाऱ्याची उधळण करीत मिरवणुकीचा कार्यक्रम रंगला. बाळूमामांची मेढरं शेतकऱ्यांनी चरायला नेली की पिकाचे उत्पादन दुप्पट निघते, असे सांगितले जाते. शेतकरी भाविक आपले पीक दुप्पट होईल या आशेने उभ्या पिकात मेढरं सोडतात.
लग्न न जमणाऱ्या मुला-मुलींनी अन्नदानाच्या पंगती वाढल्या की लग्न जमते. शेतातील माती महाराजांना दाखविली की ते शेतातील पाणी केवळ माती पाहून सांगतात. बाळूमामांच्या मेंढरांच्या कानात आपल्या इच्छा सांगितल्या की त्या पूर्ण होतात. घरात भांडण-तंटा होत असेल तर भाविकांना ताईत दिला जातो.
अन्नदान, धन, आर्थिकरूपी मदत केली केली की त्यांना वर्षात दुप्पट उत्पन्न मिळेल, असे सांगितले जाते. त्यावर भाविकांनी विश्वास ठेवून बाळूमामांच्या पालखी आयोजनावर मदत आणि पैशांचा पाऊस पाडला.
एकीकडे या मेंढरांसाठी असा मुबलक चारा असताना दुसरीकडे इतर मेंढपाळांना मात्र अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना जिवावर उदार होऊन व्यवसाय करावा लागतो. लेकराबाळांसह माळरानावर राहावे लागते. तसेच काही शेतकरी मेंढपाळांना मारहाणही करतात. त्यामुळे एकीकडे विविध पिके गवतावर ताव मारणारी बाळूमामांची मेंढरं, तर दुसरीकडे चाऱ्यासाठी रानोमाळ फिरणारे मेंढपाळ अशी स्थिती आहे.
----
अंधश्रद्धा टाळायला हवी..
खरे तर बाळूमामांच्या पालखीतील मेंढरांना चारा, पाणी ही प्राण्यांची ‘सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून अगर मानवतावादी दृष्टीने मदत केली तर यावर कोणाचीही हरकत नसेल. अशी मदत केलीच पाहिजे. मात्र भावनेच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेला उत्तेजन देणाऱ्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत.
संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज यांनीही अंधश्रद्धेवर त्या त्या वेळी प्रहार केले.
------
पोलीस ठाण्यात तक्रार..
बाळूमामांची मेंढरं, पालखी सोहळ्यातील अंधश्रद्धा आणि कोरोनाच्या काळात जमलेला जमाव आणि येथे पसरविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धेच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगताप यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फोटो : ०८ बाळूमामांची मेंढरे
श्रीगोंदा शहर परिसरातील एका शेतातील उभ्या पिकात चरत असलेली बाळूमामांची मेंढरं.