अहमदनगर : नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाकेबंदी केली. त्यानंतर मुंबई तसेच महाराष्ट्रातही फटाके बंदीची आतषबाजी करण्यात आली. या निर्णयावर व महाराष्ट्र सरकारच्या फटाके बंदीच्या भूमिकेवर व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नगर शहरातील सर्वात मोठे फटाका मार्केट कल्याण रोडवर आहे़ फटाका मार्केटमधील व्यापा-यांनी सरकारच्या भूमिकेबाबत ‘लोकमत’कडे तीव्र नाराजी व्यक्त करीत ऐन दिवाळीत हा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी, किराणा दुकानातून होणा-या फटाके विक्रीला अहमदनगरमधील व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला असून, प्रशासनाने अशा फटाके विक्रीवर कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. निवासी ठिकाणी फटाके विक्रीवर बंदी घालण्याशी सहमती दर्शविली आहे. मात्र, निवासी ठिकाणापासून दूर असलेल्या फटाके विक्रीवर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
फटाके वाजल्यापासून नेमका काय त्रास होतोे याचा शोध घ्यावा. फटाक्याच्या ध्वनी प्रदूषणाचे प्रात्यक्षिक घ्यावे. फटाक्यासाठी १२५ डेसिबलची जरी मर्यादा आहे. प्रत्यक्षात ९५ डेसिबलपेक्षा जास्त एकाही फटाक्याचा आवाज येत नाही. त्यामुळे सरसकट बंदी चुकीची आहे. यामुळे व्यापारी वर्ग व ग्राहक यांच्यामध्ये संभम्र निर्माण झाला आहे. सर्वात जास्त प्रदूषण वाहनांमुळे होत आहे. त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. आनंदाच्या क्षणी, सण उत्सवातच फटाके वाजविले जातात. त्यामुळे निर्णय योग्य म्हणता येणार नाही. मोठा व्यवसाय असल्याने अनेकांना या माध्यमातून रोजगारही मिळतो. यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. निवासी भागातील फटाके विक्री बंदीचे आम्ही स्वागतच करतो. मात्र निवासी भाग कोणता याचे स्पष्टीकरण करावे. तसेच शहराच्या मध्यवस्तीत, लोकवस्तीतही बंदी असावी. बेकायदेशीर विक्रीवर प्रशासनाने कारवाई करावी. पारंपरिक सण असल्याने फटाक्यांची विक्री पूर्वापार सुरु आहे. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे.- कैलास गिरवले, अध्यक्ष, अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन
सध्या नोटाबंदी व जीएसटीमुळे मार्केट थंड आहे. फटाके बंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील व्यापारी फटाके खरेदी करत नाहीत. ग्राहकही खरेदी करण्यास उत्सुक नाहीत. भारतीय संस्कृतीचा विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे. पारंपरिक सण, उत्सव साजरा करण्यास विरोध कशासाठी केला जातो हे समजत नाही. फटाक्याव्यतिरिक्त इतर कारणांनी होणाºया प्रदूषणावर शासनाने विचार करण्याची गरज आहे. दिवाळी तोंडावर आल्यानंतर शासन बंदीबाबत संभम्र निर्माण करत आहे. सर्व बाबींचा विचार करुन शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे.- गणेश क्षीरसागर
मी सोनईवरुन फटाके खरेदीला नगरच्या मार्केटमध्ये आलो आहे. मात्र फटाके बंदी नेमकी कुठे काय कशासाठी याबाबत मी संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी खरेदी करणार आहे. माझ्यासारखे ग्रामीण भागातील व्यापारी या निर्णयामुळे धास्तावले आहेत. सण उत्सवाच्या काळात केली जाणारी फटाके बंदी अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने यावर विचार करुनच पुढील पावले उचलणे गरजेचे आहे. सरकारविरुध्द सर्वसामान्य लोक या निर्णयामुळे नाराज आहेत.- प्रकाश घावटे, सोनई ता. नेवासा