प्रमोद आहेरशिर्डी : राज्य विधिमंडळाने हिवाळी अधिवेशनात शिर्डी विमानतळास ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्याचा प्रस्ताव गुरुवारी एकमताने मंजूर केला. मात्र ६२ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने साईबाबांच्या नावाचा व प्रतिमेचा वापर करण्यास कायदेशीर मनाई केली होती. त्याबाबत खुद्द साई संस्थानही अनभिज्ञ आहे.शिर्डीतीलच नव्हे तर देश-विदेशातील अनेक हॉटेल्स, दुकाने, कारखाने अशा व्यावसायिक ठिकाणांबरोबरच रस्ते, रेल्वेस्थानक, विमानतळ, नगरांना साईबाबांचे नाव दिलेले आहे. ६२ वर्षांपूर्वी मात्र संस्थानच्या मागणीनुसार केंद्र सरकारने साईबाबांच्या नावाचा व प्रतिमेचा वापर करण्यास कायदेशीर मनाई केली होती.शिर्डीतील किमान ९५ टक्के दुकान, हॉटेल्स, रेस्टॉरंटला साईबाबांचे नाव आहे. देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक व्यावसायिक ठिकाणांना साईबाबांचे नाव सर्रास देण्यात आले आहे.केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने २१ सप्टेंबर १९५५ रोजी एक आदेश काढून साईबाबांच्या नावाचा व प्रतिमेच्या वापरास बंदी केली होती़ ट्रेडमार्क कायद्यानुसार संस्थान सोडून अन्य कोणत्याही व्यावसायिक व धंदेवाईकास ‘श्री साईबाबा’, ‘श्री साई’ वगैरे नावे वस्तू, व्यावसायिक आस्थापना अथवा संस्थेला देणे किंवा लावणे भाविकांच्या भावनेला बाधक असल्याने निषेधार्ह व बेकायदेशीर समजले जाईल, असे आदेशात म्हटले होते़ त्याचप्रमाणे धंद्यासाठी श्रीसाईबाबांचे छायाचित्र, रेखाचित्राचा अथवा प्रतिमेचा वापर करण्यासाठी मंत्रालयाने मनाई केली होती़ हा निर्बंध मोडणाºयांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता़डॉ़ केशवराव गव्हाणकर यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाने संबंधित मंत्रालयाला २४ जून १९५५ रोजी पत्र पाठवून ट्रेड मार्कसाठी विनंती केली होती़ त्यानुसार हा आदेश काढला होता़
साईबाबांचे नाव वापरण्यास बंदी, आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 3:15 AM