|
अहमदनगर: जिल्हा उपकारागृहातील एका बंदीवानाकडे चक्क सीमकार्ड आढळून आले आहे. या त्याच्या कृत्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. जिल्हा कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे महिनाभराच्या रजेवर आहेत. त्यांचा कार्यभार विसापूर कारागृहातील योगेश पाटील यांच्याकडे आहे. कार्यभार स्वीकारताच त्यांनी कैद्यांची झडती घेण्याचे आदेश कारागृहातील कर्मचार्यांना दिले. यावेळी कारागृहात असलेला बंदीवान विष्णू बारिकराव रासकर याच्या अंगझडतीमध्ये एका कंपनीचे सीमकार्ड आढळून आले. रासकर याने त्याच्या कपड्यामध्ये हे कार्ड लपवून ठेवले होते. रासकर हा नेवासा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन महिन्यांपासून तो कारागृहातच आहे. रासकरने सीमकार्डचा वापर केला का, केला असेल तर त्याने त्यासाठी मोबाईल कोठून उपलब्ध केला, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. कारागृहातील कैद्यांकडे काय नसावे, याची यादी कारागृह संचालकांनी तयार केली आहे. त्यामध्ये मोबाईल, सीमकार्ड याचा समावेश आहे. सीमकार्ड आढळून आल्यास तो गुन्हा ठरतो. त्यानुसार कारागृहातील सुरक्षा रक्षक नागराज अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) |