अहमदनगर : उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकामध्ये खाते काढण्यास सांगण्यात आले आहे. परंतु केवळ दीडशे ते अडीचशे रुपयांसाठी एक हजार रुपये खर्चून खाते उघडावे लागणार असल्याने पालकांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना सन २०२१ च्या उन्हाळी सुटीत धान्य वाटप करायचा निर्णय घेण्यात आला असून धान्याच्या प्रत्यक्ष खर्चाएवढी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे. विविध शैक्षणिक योजनांसाठी काही विद्यार्थ्यांचे बँक खाते आहेत. परंतु ती संख्या कमी आहे. सध्या शालेय पोषण आहार करिता धान्यासाठी अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे सुटीतील ३५ दिवसांचे अनुदान पहिली ते पाचवी करिता १५६ रुपये, तर सहावी ते आठवीसाठी २३४ रुपये मिळणार आहे. त्यामुळे दीडशे ते अडीचशे रुपयांच्या निधीकरिता एक हजार रुपये भरून बँक खाते काढणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही, अशी नाराजी पालकांकडून व्यक्त होत आहे.
-------------------
पहिली ते पाचवी लाभार्थी संख्या - २,७६,१७०
सहावी ते आठवी लाभार्थी संख्या - १,८७,७९१
एकूण - ४,६३,९६१
एकूण शाळा - ४,५४७
-------------------
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६ रुपये
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - २३४ रुपये
--------------
बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये
बँकेत खाते उघडण्यासाठी कमाल एक हजार रूपये लागतात. परंतु लहान मुलांचे खाते उघडताना केवायसी व अन्य कारणांमुळे विलंब होतो. यात एटीएम कार्ड व सेवेचा लाभ दिला जातो. मागील वर्षीच अग्रणी बँकेच्या माध्यमातून नवीन खाते उघडण्यासाठी विभागनिहाय बँका ठरवून दिलेल्या आहेत. परंतु १५० ते ३०० रूपयांसाठी एक हजार रूपये आधी जमा करणे अनेक पालकांना अशक्य आहे.
-----------
पालकांची डोकेदुखी वाढली
शालेय पोषण आहाराच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशासाठी बँकेत खाते उघडण्यासाठी शाळांकडून सूचना दिल्या जात आहेत. परंतु सध्या कोरोनामुळे बँकेत गर्दी करणे योग्य नाही. अशात खाते उघडणे जिकिरीचे आहे.
- कुंडलिक चोपडे, अहमदनगर
--------
दीडशे ते दोनशे रूपयांच्या रकमेसाठी बँकेत खाते उघडणे गैरसोयीचे आहे. खाते उघडले की त्यात किमान रक्कम ठेवावी लागते, अन्यथा बँकेकडून दंड केला जातो. यात पालकांचे नुकसान आहे.
- राजेश कर्डिले, अहमदनगर
--------------