शिर्डी: साईबाबांना दानात आलेल्या नाण्यांवर मार्ग काढण्यासाठी आज रिझर्व्ह बँक इंडियाने आज मुंबईत बैठक बोलावली आहे.आज दुपारी बारा वाजता मुंबईत आरबीआयच्या कार्यालयात ही बैठक होत आहे. यासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी व साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे संस्थानचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत. साईबाबांना भाविक रोज लाखो रुपयांचे दान टाकत असतात. यात सोने, चांदी, परकीय चलन, नोटा बरोबरच मोठ्या प्रमाणावर नाणी असतात.संस्थान आठवड्यातून दोनदा बाबांना आल्येल्या दानाची मोजदाद करत असते. संस्थानला आलेली देणगी बँक प्रतिनिधींव धमार्दाय आयुक्तांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मोजून राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येते.सध्या शिर्डीत बँकामध्ये अडीच कोटीपेक्षा अधिक रकमेची नाणी पडून आहेत. काही बँकांकडे आता नाणी ठेवण्यास जागा नाही, त्यामुळे १५ जून रोजी बँकांनी चिल्लर घेण्यास नकार दिल्याने संस्थानला दानपेटीतील रकमेची मोजदाद करता आली नव्हती.यावर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरबीआय ला पत्र पाठवून यात मार्ग काढण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी आरबीआयने आज बैठक बोलावली आहे.
साईदरबारची चिल्लर घेण्यास बँकाचा नकार : तोडगा काढण्यासाठी आज आरबीआयची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:32 AM