अहमदनगर: दोन वर्षापूर्वी दारूबंदी झालेल्या निघोजमध्ये (ता़ पारनेर) हॉटेलमधून खुलेआम देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री पोलीसांनी येथील सहा हॉटेलवर छापा टाकून १ लाख ३४ हजार ३४४ रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या पथकाने हा छापा टाकला़ निघोज येथील हॉटेल संदिप, हॉटेल, विजय, हॉटेल मंथन, हॉटेल जत्रा, हॉटेल आपली जत्रा, हॉटेल राजयोग अशा सहा ठिकाणी छापा टाकला. यावेळी प्रत्येक हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. यातील कोणत्याच हॉटेलला दारू विक्रीचा परवाना नाही. यावेळी पोलीसांनी संतोष रतन वरखडे, विजय पोपट वराळ, राहुल राजू लाळगे, गणेश भाऊ भूकन, मंगेश बाळासाहेब लाळगे व योगेश सावकार लाळगे यांना अटक करून त्यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कलवानिया यांच्यासह सहाय्यक फौजदार कल्याण शेळके, हवालदार रविंद्र पांडे, किरण अरकल, डाके, धनंजय करांडे, परकाळे, एस़एस़ काळे, डुचे, जाधव, संजय बुगे, मोरे, रोहोकले यांच्या पथकाने ही कारवाई केली. उत्पादन शुल्कचे अधिकारी करतात कायअवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे. या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हॉटेलमालकाची असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे या अवैध दारूविक्रीकडे दुर्लक्ष करत आहेत. एकट्या निघोज गावात सहा हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री सुरू असताना उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची डोळेझाक संशयास्पद आहे. तसेच स्थानिक पोलीसही या दारूविक्रीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपी स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.