शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

मरेपर्यंत समाजसेवा करणारे बापूसाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 5:53 PM

शेतक-यांच्या जमिनी घेऊन १९११ साली पिंपळगाव माळवी येथे तलाव बांधण्यात आला. मात्र, १९२८ सालापर्यंत शेतक-यांना त्याचा मोबदला मिळाला नव्हता. शेतक-यांनी बापूसाहेबांकडे गाºहाणे मांडले़ बापूसाहेब तडक प्रांताधिका-यांकडे गेले आणि नुकसान भरपाई मिळवून दिली़ १०० रुपयांमागे ५ रुपये बापूसाहेबांनी घ्यावेत, असा आग्रह शेतक-यांनी धरला़ ‘मरेपर्यंत समाजसेवा करणार’ असे स्टँप पेपरवर लिहून देणारे बापूसाहेब शेतक-यांच्या एका पैशालाही शिवले नाहीत.

अहमदनगर : बापूसाहेबांचे मूळ गाव कोळगाव (ता़ श्रीगोंदा)़ कोळगावच्या भापकरवाडीत त्यांचे आजोबा रहायचे़ तो भाग नेहमी दुष्काळी असे. शेती अगदीच जुजबी. म्हणून बापूसाहेबांच्या आजोबांनी ते गाव सोडले अन् नगरला आले. बापूसाहेबांचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी झाला. बापूसाहेब लहानपणापासून अभ्यासात कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्त्व़ १९१८ साली त्यांनी हायस्कूलच्या स्कॉलरशिप परीक्षेत पहिला क्रमांक मिळविला़ त्यांना महिन्याला ५  रुपये स्कॉलरशिप मिळत होती़ नंतर १९२१ साली बापूसाहेब उत्तम गुणांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुणे येथे गेले. अडचणी होत्याच. पण बापूसाहेबांकडे जिद्द व चिकाटी होती. मोठ्या प्रयत्नातून त्यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तेथेही त्यांनी स्कॉलरशिप मिळविली. फर्ग्युसन कॉलेज व डेक्कन कॉलेज अशा दोन ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. १९२५ साली ते बी.ए. झाले. मराठी व इंग्रजी विषयात प्राविण्य मिळविले. त्यामुळे त्यांना दरमहा ५० रुपयाची फेलोशिप मिळाली. १९२७ साली ते मराठी व इंग्रजी या दोन विषयासह एम.ए. झाले. त्याचवेळी त्यांनी एलएलबीच्या पदवीचा अभ्यास केला व पदवी प्राप्त केली. शेतकरी कुटुंबातून खेडेगावातून एमए, एलएलबी झालेले नगर जिल्ह्यात ते पहिलेच विद्यार्थी असावेत.विद्यार्थी दशेपासूनच महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे त्यांच्यावर संस्कार झाले होते़ त्यातूनच त्यांनी विद्यार्थ्यांच्या संघटना उभ्या करुन स्नेहसंमेलने घडवून आणली. वेगवेगळे कार्यक्रम घेतले़ उच्च शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापूरचे दिवाण अण्णासाहेब लठ्ठे यांचे ज्युडिशिअल सेक्रेटरी म्हणून काही काळ त्यांनी काम केले. तसेच सब जज म्हणूनही नोकरी मिळाली. परंतु ज्या ध्येयाने ते कोल्हापूरला आले होते, ते ध्येय साध्य होत नाही, असे त्यांच्या मनाने घेतले. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन ते अहमदनगरला आले. वकिली सुरु केली़अहमदनगर शहराचा पाण्याचा प्रश्न मोठा बिकट होता. १९११ साली नगर येथून ११ मैलावर पिंपळगाव माळवी येथे तलाव बांधण्यात आला. त्यासाठी शेतकºयांच्या जमिनी घेतल्या. १९२८ सालापर्यंत शेतकºयांना त्याचा मोबदला मिळाला नव्हता. त्याच साली बापूसाहेब नगरला वकील होऊन आले. शेतकºयांना बापूसाहेबांची माहिती समजली. शेतकरी खंडू गुंजाळ, यशवंतराव झिने यांच्यासह २० ते २५ जण बापूसाहेबांकडे आले. बापूसाहेबांकडे गाºहाणे सांगितले. शेतकºयांना बरोबर घेऊन बापूसाहेब त्या भागाचे प्रांताधिकारी यांच्याकडे गेले. प्रांताधिकाºयांना शेतकºयांचे पैसे देण्यास बापूसाहेबांनी भाग पाडले़ शेतकºयांना पैसे मिळाले़ पैसे घेताना १०० रुपयांमागे  ५ रुपये तुम्ही घ्या, अशी विनंती शेतकºयांनी बापूसाहेबांना केली. बापूसाहेबांनी ती विनंती नाकारली. ते म्हणाले, ‘‘लोक पाणपोई सुरु करतात़ तहानलेल्यांची तहान दूर करतात. त्याचे पैसे घेतात का? मग मी कसा पैसा घेऊ? पैसाच मिळवायच्या ध्येयाने मी ग्रासलो असतो तर मी आता लखपती असतो!’’शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू  आले. या घटनेचा जिल्ह्यात मोेठा बोलबाला झाला. लोकांची धाव बापूसाहेबांकडे सुरू झाली. दुष्काळी शेतकरी, विशेषत: कुळ शेतकºयांची रीघ बापूसाहेबांकडे लागली़ ग्रामीण भागातील अज्ञान, दारिद्र्य पाहून त्यांनी आपल्या शिक्षणाचा व वकिलीचा समाजसेवेसाठीच उपयोग केला. हा काळ होता साधारण १९२९-३०चा़ यानंतर ते शेतकरी चळवळीचे सच्चे नेते बनले. त्यावेळी सावकारशाही विरुद्ध कुळ शेतकरी अशी चळवळ जोरात होती़ नगर जिल्ह्यात बापूसाहेबांनी या चळवळीचे नेतृत्व केले. लोणीचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पारनेरचे नामदेवराव औटी व गंगाराम औटी, अकोळनेरचे (ता.नगर) अनंतराव शंकरराव जाधव, सारोळ्याचे कृष्णाजी काळे अशा अनेकांनी त्यांना साथ दिली. पारनेर येथे एका मारवाडी सावकाराचा खून झाला होता़ त्या खुनाचा आरोप नामदेवराव औटी यांच्यावर ठेवला. त्यांना अटक केली गेली. तुरुंगात डांबले. दरम्यान नामदेवराव पाटलांच्या धर्मपत्नी सरूबाई यांचे निधन झाले़ हातात बेड्या घालूनच नामदेवराव पाटलांना बायकोचा अंत्यविधी करावा लागला. बापूसाहेबांच्या मनाला या गोष्टीची चीड आली. त्यांनी नामदेवरावांचे वकीलपत्र घेतले. त्यांना कैदेतून निर्दोष सोडवून आणले़कुळांचे लढे चाललेले असतानाच त्यांनी दुष्काळी शेती व शेतकºयांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले. शेतकºयांच्या प्रश्नावर त्यांनी लेख लिहिले़ सभा घेतल्या़ भाषणे दिली़ परिषदा भरवल्या़ मोर्चे काढले. गावोगाव सायकलवर फिरून लोकांचे प्रबोधन केले. सुमारे १३०० खेड्यांना भेटी दिल्या. गावांशी चर्चा केल्या. प्रश्न समजावून घेतले.दरम्यान कोल्हापूरचे भास्करराव जाधव यांच्या भेटीस पुण्याला बापूसाहेब गेले होते. भास्कररावांचे बंधू गोविंदराव यांची मुलगी- हिराबाई  यांना तेथे बापूसाहेबांनी पाहिले़ नंतर १३ मे १९३० साली बापूसाहेबांचा हिराबार्इंशी पुणे येथे विवाह झाला. हिराबाई लग्नाच्या वेळी २३ वर्षांच्या होत्या. बापूसाहेब शेतकरी चळवळीचे नेतृत्व करू लागले. शेतकरी कर्जबाजारी होते. मोठ्या प्रमाणात जमिनीची मालकी सावकारांकडे गेली होती. शेतकºयांना घामाचा दाम मिळण्यात अन्याय होत होता. मालकास २ वाटे व शेतकºयास ३ वाटे, अशी शेतकºयांची न्याय्य मागणी होती. पारनेर तालुक्यात या संघर्षाला सुरुवात झाली. शेतकºयांनी जमीन मालकांशी असहकार पुकारला. पारनेर तालुक्यात सुमारे पाच हजार एकर जमीन पडीक पडली. अशी परिस्थिती बºयाच भागात होती. चोहीकडे या चळवळीचे लोण कमी-जास्त प्रमाणात सुरू झाले. बापूसाहेबांनी या कार्यात स्वत:ला झोकून दिले.  प्रसंगी बापूसाहेब पक्षकाराला भाड्याला पैसेसुद्धा द्यायचे आणि हिराबार्इंनी भाजी-भाकरी द्यायची! बापूसाहेबांची आर्थिक स्थिती बिघडू लागली. पण त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी जो स्वार्थत्याग केला, त्याला तोड नव्हती.बापूसाहेब १९३६ ला नगर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी रावसाहेब पटवर्धन यांच्याविरुद्ध निवडून आले. कॉ. डी. बी. कुलकर्णी यांच्या सहाय्याने ही निवडणूक त्यांनी लढविली.हे चळवळीतील काम चालू असताना राष्टÑीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीतही ते सहभागी झाले़ १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी उडी घेतली़ त्यात त्यांना १ वर्षाचा तुरुंगवास सोसावा लागला. पुढे मोरारजी देसार्इंच्या सरकारनेही त्यांना १ वर्ष तुरुंगात डांबले.बापूसाहेबांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे म्हणून जिल्हा लोकल बोर्डात (नगर) कार्य करण्याचे ठरविले. साधारण १९३५ ते १९५३ याकाळात त्यांनी जिल्हा लोकल बोर्डाचे राजकारण केले. जनतेशी संपर्क वाढल्यामुळे व त्यांच्या नि:स्वार्थी सेवावृत्तीमुळे ते सतत बोर्डात निवडून येत असत. सन १९३९-४१ व १९५२-५३ याकाळात ते बोर्डाचे अध्यक्ष होते. जिल्हा स्कूल बोर्डाचेही ते तीन वर्षे चेअरमन होते. ग्रामीण विकासाची व शैक्षणिक प्रसाराची, पिण्याच्या पाण्याची, रस्ते, दवाखाने इत्यादी बाबतची चळवळ त्यांनी लोकल बोर्डामार्फत हाताळली. दुष्काळाबाबत कलेक्टरांकडून ‘दुष्काळ निवारण फंडा’ची सोय केली. स्कूल बोर्डातर्फे ‘नगर शिक्षक’ हे मासिक चालू केले. शिक्षकांची संमेलने भरविली. प्रौढ शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन दिले.लोकल बोर्डाप्रमाणेच बापूसाहेबांनी नगरच्या पालिकेत सुमारे ४० वर्षे सेवाभावी कार्य केले. नगरपालिकेच्या प्रगतीसाठी त्यांची मदत झाली. नगरपालिकेतील कामगारांची संघटना त्यांनी उभारली व ते अध्यक्षही होते. तसेच मैलकोले कामगारांची संघटना उभारून त्यांचे पगाराचे प्रश्न सोडविले. साखर कारखाना कामगार (बेलवंडी) शेतमजूर, कोतवाल, पी.डब्ल्यू.डी. कामगार यांच्या संघटनातही त्यांनी भाग घेतला. अनेक संघटनांना मार्गदर्शन केले. कामगार संघटना लाल निशाण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढे चालू ठेवल्या व त्या आजही चालू आहेत.सहकारी संस्थांच्या कार्यातही त्यांनी मार्गदर्शन केले. शेतीच्या विकासासाठी सहकारी सोसायट्यांचा उपयोग झाला पाहिजे, तरच शेतीचा विकास होईल, अशा पद्धतीने त्यांनी या चळवळीतही आस्थेने लक्ष घातले. १९३७-३८ याकाळात को-आॅपरेटीव्ह इन्स्टिट्यूटचे ते अध्यक्ष होते.१९४६ च्या प्रांतिक निवडणुकात त्यांनी भाग घेतला. प्रारंभी ते काँग्रेसमध्येच होते. जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते २ वर्षे अध्यक्षही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये आला. १९४६ च्या  निवडणुकीत ते आमदार झाले. मात्र त्यावेळी काँग्रेसमध्ये भांडवलदार गटाचे वर्चस्व होते. बापूसाहेबांच्या ध्येय-धोरणाशी हे विसंगत होते. म्हणून त्यांना वाटे की, काँग्रेसवर शेतकरी-कामगार या बहुजनांचे वर्चस्व नाही. आपण स्वतंत्र मार्ग धरला पाहिजे़ १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासूनच कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कॉ. रणदिवे, कॉ. एस़ के ़लिमये यांच्या वैचारिक नेतृत्वाखाली महाराष्टÑात कम्युनिस्ट चळवळ वाढत होती. महाराष्टÑात बापूसाहेबांसह केशवराव जेधे, कॉ. शंकरराव मोरे, क्रांतिसिंह नाना पाटील, तुळसीदास जाधव, भाई ऩ ऩ सथ्था या पुढाºयांनी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्ष असा नवा कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला होता. महाराष्टÑातील नवजीवन संघटना हा एक कम्युनिस्ट गटही या पक्षात सामील झाला. या गटाचे नेते कॉ. दत्ता देशमुखही शेतकरी कामगार पक्षात दाखल झाले. नंतर पुढे हा गट क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडला व त्यांनी कामगार किसान पक्ष स्थापन केला. नगर जिल्ह्यातून बापूसाहेब भापकर, कॉ. दत्ता देशमुख व भाई सथ्था या पक्षात गेले. पुढे या कामगार पक्षाचे विसर्जन झाले. त्यातून लाल निशाण गट व कालांतराने लाल निशाण पक्ष उभा राहिला. बापूसाहेब या पक्षाबरोबर काम करीत राहिले. या काळात बापूसाहेबांनी १९५२, ६२, ६६, ७२ या वर्षी पडलेल्या दुष्काळात जनतेचे लढे उभे केले. १९५२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. या दशकात त्यांनी हिराबार्इंसह स्वत:ला गोवा मुक्ती आंदोलनात व संयुक्त महाराष्टÑाच्या आंदोलनात पूर्णपणे झोकून दिले. सत्याग्रह केला. त्यांचे ‘आनंद-कुंज’ घर जिल्ह्यातील आंदोलनाचे प्रमुख केंद्र होते. बापूसाहेबांनी १९५७ ची विधानसभेची निवडणूक लढवून ते पुन्हा आमदार झाले. १९६२ व ६७ सालांच्या निवडणुका त्यांनी लढविल्या़ पण त्यात त्यांना अपयश आले़ पैशाशिवाय निवडणुका लढविणे ही त्यांची खासियत होती. डोक्यावर टोपी घालून प्रत्येकाला नमस्कार करणे आणि पायी फिरणे ही त्यांची प्रचाराची पद्धत होती. तरुणांशी संपर्क हा त्यांच्या राजकारणाचा प्राणवायू होता. ते म्हणत- ‘जनतेनेच चळवळीतून मला शिकविले, त्यांनीच प्रेम दिले.’ बापूसाहेब विचार-आचारात स्वच्छ राहिले. त्यागाचा कृतिशील आदर्श त्यांनी मागे ठेवला. ‘जनसेवा-ईश्वरसेवा’ हे रूळलेले शब्द त्यांच्या कर्तृत्वाने लोकांपुढे साक्षात उभे राहिले.बापूसाहेबांनी नि:स्वार्थीपणे आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा दिला. स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेची अभिलाषा धरली नाही. महात्मा गांधीजींच्या विधायक कार्याचा-खादीवापर, हरिजनोद्धार पुरस्कार केला. महात्मा गांधीजींचा आदर्श समोर ठेवला. तसेच पंडित नेहरूंच्या नेतृत्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे नेतृत्व भारताला वरदान आहे, असे त्यांना वाटे. तसेच सत्यशोधक चळवळीवर जिल्ह्यात भाषणे देत, मार्गदर्शन करीत. तरवडीचे (नेवासा) ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात संस्कृतचे पंडित शिक्षक म्हणून गौरविलेले गोविंदराव शिदोरे या चळवळीत होते. बापूसाहेबांच्या व त्यांच्या चर्चा होत. बापूसाहेब खेडोपाडी जाऊन अनिष्ट रूढी, प्रौढ विवाह, स्त्री शिक्षण, शिक्षण प्रसार, हुंड्याची चाल बंद करणे, हुंडाबंदी या गोष्टींबद्दल लोकांना जागृत करीत, प्रबोधन करीत. सत्यशोधक चळवळ म्हणजेच समाजवादी विचारसरणी असे ते सांगत. कमी खर्चात लग्न, जात, धर्माच्या नावाने अंधश्रद्धा नको, यावरही भाषणे देत. त्यांनी शिक्षण प्रसाराची चळवळ राबविली. तत्कालीन आमदार कॉ. भास्करराव औटी, बाळासाहेब काळे, कॉ. दत्ता देशमुख, भाई सथ्था, तत्कालीन आमदार कि. बा. म्हस्के, आ. फलके गुरुजी, शिक्षणतज्ज्ञ रा. मो. शिंदे इत्यादींच्या सहकार्याने सुमारे ७५० व्हॉलिंटीयर शाळा वाड्या-वस्त्यांवर सुरू केल्या. या सर्व शाळा नंतर (१९६०) जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्या गेल्या. ‘अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज’ संस्थेचे अध्यक्षपदही बापूसाहेबांनी काही काळ भूषविले़ या संस्थेच्या उभारणीत बापूसाहेबांनी सुमारे ६० वर्षे काम केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श बापूसाहेबांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवला होता. रयत शिक्षण संस्थेस शिक्षण प्रसाराच्या कामी बापूसाहेबांनी कर्मवीरांना मोठी साथ दिली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा अफाट लोकसंपर्क होता. कर्मवीर त्यांच्या घरी मुक्कामी असत. सकाळीच दही-भाकरी खाऊन दोघे समाज कार्यासाठी बाहेर पडत, अशा आठवणी हिराबार्इंनी सांगितल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण कार्याबद्दल (सुवर्ण महोत्सव) नगर जिल्ह्यातर्फे सत्कार करून त्यांना १ लाख रुपयांचा गौरव निधी अर्पण करण्याचे ठरले. त्यात बापूसाहेब त्यांच्या सहकाºयांसह अग्रभागी होते. हा कार्यक्रम भारत  सरकारचे तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे १९५९ रोजी नगरमधील रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या प्रांगणात झाला़ डॉ. धनंजयराव गाडगीळ, दुर्गाबाई देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. असा कार्यक्रम घेण्यात नगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर होता. बापूसाहेब विद्यार्थ्यांना सी. डी. देशमुखांच्या अभ्यासाच्या, हुशारीच्या गोष्टी सांगत. त्यांच्या ‘माझा जीवनप्रवाह’ या आत्मचरित्राची माहिती देत. बापूसाहेबांनी जामगाव व श्रीगोंदा येथील शिंदे सरकारची इस्टेट रयत शिक्षण संस्थेला मिळविण्याच्या प्रयत्नातही कर्मवीरांना सहकार्य केले.कर्मवीर अण्णांचे आजारपणात पुणे येथे ९ -- १९५९ ला निधन झाले. बापूसाहेब अंत्यदर्शनासाठी सातारा येथे गेले. तेथे महाराष्टÑाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणही होते. बापूसाहेबांनी श्रद्धांजली भाषणात यशवंतरावांना आवाहन केले- ‘‘कर्मवीरांच्या पायाची शपथ घेऊन त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याची प्रतिज्ञा करा!’’ पुढे यशवंतराव चव्हाण यांनी ‘रयत’चे अध्यक्षपद स्वीकारून कर्मवीरांचे कार्य चालू ठेवले.बापूसाहेबांनी संयुक्त महाराष्टÑ चळवळीत व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर रझाकार (हैद्राबाद मुक्तीसंग्राम) विरोधी चळवळीत भाग घेतला. क्रांतिसिंह नाना पाटील, खुंटेफळ  (ता.आष्टी) येथील साहेबरावदादा थोरवे हे बापूसाहेबांच्या घरी येत. बापूसाहेबांनी गोवा मुक्ती संग्रामातही भाग घेतला. पारनेरचे सेनापती बापट, कॉ. भास्कररावांच्या पत्नी ताराबाई औटी आदी बरोबर होते. ताराबार्इंनी गोवा सत्याग्रहातील पहिल्या तुकडीत गोवा सीमेवर सत्याग्रह केला.साधारण १९७०-१९८० च्या दशकातील बापूसाहेबांचा राजकीय प्रवास थोडेसे वळणे घेत झालेला दिसतो. १९७४ च्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ व बँक राष्टÑीयीकरणाचा प्रभाव सर्वच डाव्यांच्या विचारसरणीवर पडला! तसा तो बापूसाहेबांच्यावरही झालेला होता. ते इंदिरा गांधी यांच्या विचारांकडे खूपच आकर्षित झाले होते. मात्र त्याचवेळी त्यांना जयप्रकाश नारायण यांचेही विचार प्रभावी वाटत़ परंतु लाल निशाण व कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनास विरोध होता. त्यामुळे ते या आंदोलनात उतरले नाहीत, असे असावे. आणीबाणीत ते शांत राहिले. हे बहुधा लाल निशाणच्या प्रभावाखाली घडले असावे. मात्र आणीबाणी उठल्यानंतर त्यांनी पुन्हा इंदिरा गांधींच्या राजकारणाला पाठिंबा दिला. लाल निशाणमध्येही मुख्य पुढारपण हे इंदिरा गांधींना पाठिंबा देण्याच्या बाजूचे होते. १९८५ नंतर बापूसाहेब राजकीय हालचालीपासून काहीसे अलिप्त राहिले. मात्र ते त्यांची वैयक्तिक मते पूर्वीच्याच जोशात मांडीत असत. विशेषत: कॉलेजमधील युवक-युवतींशी ते संवाद साधीत असत.बापूसाहेबांचे लेखन-काव्य असो किंवा गद्य लेख, एक टाकी असे. त्यात अजिबात खाडाखोड नसे. त्यांच्या लेखनात सत्यता व वास्तवता असे. शेतकरी चळवळीत नेतृत्व करीत असतानाच त्यांनी दोन पुस्तके प्रकाशित केली. ‘शेतकºयांच्या झोपडीत’ या पुस्तकाला रावसाहेब पटवर्धन यांची प्रस्तावना आहे. तसेच ‘विकासाचे प्रयत्न’ अशी एक पुस्तिका प्रकाशित केली. बापूसाहेबांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत तल्लख होती. ते नावा-गावानिशी भाषण करू लागले की, कॉ. दत्ता देशमुख उजवा हात तोंडावर ठेवून नवलाईने पाहत असत. थोडक्यात ‘जे का रंजले-गांजले..त्यासी म्हणे जो आपुले’ या संत श्रेष्ठ तुकोबांच्या वचनाप्रमाणे बापूसाहेब जगले. कॉ. पी. बी. कडू पाटील सांगतात- ‘‘बापूसाहेबांच्यामुळेच आम्ही काही मंडळी निवडणुकीत उतरलो.’’बापूसाहेबांकडे काव्य प्रतिभा होती. त्यांनी शेवटी शेवटी इंग्रजी-मराठी अशा सुमारे ४००-५०० कविता केल्या. थोरांची जयंती-पुण्यतिथी किंवा असेच काही निमित्त प्रासंगिक असे. अशा वेळी विशेषत: इंग्रजी-सॉनेट (सुनीत) १४ ओळींची रचना) रचनेत त्यांचे काव्य निर्माण होई व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक चाट पडत. कविता टाईप केलेल्या असत व ते छापून विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना देत असत. त्यांनी कवी म्हणून ‘हिराप्रभा’ (हिराबाई प्रभाकर) असे टोपण नाव घेतलेले आहे. इंग्रजी कवितांची चर्चा, बोलबाला झाल्यावर ‘स्काय-बर्ड’ असा एक प्रातिनिधीक इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित केला. 

हिराप्रभाची कहाणीनेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न इंदिरा गांधी, संत मेहेरबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, १५ आॅगस्ट, मोडक हाऊस, कॉ. चंद्रभान आठरे, नेत्रतज्ज्ञ डॉ. मोदी, नायगरा फॉल्स (परदेश दौºयाच्या वेळी पाहिल्यावर), आपण सारे भारतीय, लोकमान्य टिळक, हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज अशा अनेक कवितांचा हा काव्यसंग्रह बापूसाहेबांनी हुतात्म्यांना व स्वातंत्र्यसैनिकांना अर्पण केला आहे. तसेच पुण्याच्या प्रा. डॉ. अनुराधा पोतदार-घाटे यांनी ‘स्कायबर्डची भरारी’ असा एक अप्रतिम लेख ‘हिराप्रभाची कहाणी’ या आत्मकथेत प्रकाशित केला आहे. याचे १९८७ साली शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले़ (संपादन- प्रा. डॉ. भि. ना. दहातोंडे). इंग्रजी कवी शेक्सपिअर, शेले, कीटस् हे बापूसाहेबांचे आवडते कवी, अशी त्यांनी नोंद करून ठेवली आहे़ मराठीमध्ये ‘श्री तुकारामांच्या अभंगवाणी’चे ते वाचक होते. ‘सांजवात’च्या लेखिका आनंदीबाई शिर्के, डॉ. सरोजिनी बाबर, ख्यातनाम शैलीदार लेखक वि. द. घाटे यांच्याशी बापूसाहेब व हिराबाई दोघांचाही पत्रव्यवहार असे. बडोद्याचे सत्यशोधक ‘जागृती’कार भ. ब. पाळेकर, ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्याशीही पत्रव्यवहार व भेटीगाठी होत. भ. ब. पाळेकर यांनी १९६२-६४ मध्ये नगर जिल्ह्याचा दौरा केला, तेव्हा त्यांनी संस्थेस भेट दिली. संस्थेच्या नेते मंडळीशी शैक्षणिक, सामाजिक चर्चा केली. त्यावेळी बाळासाहेब काळे अध्यक्ष होते. ‘जागृति’कार पाळेकर या ग्रंथाची चर्चा झाली व शाखा-शाळांना तो ग्रंथ उपलब्ध केला.बापूसाहेबांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा या परदेशाचा दौरा केला. तसेच त्यांनी मँचेस्टर कॉलेज, आॅक्सफर्ड विद्यापीठ येथेही भेटी दिल्या़ कारण तेथे महर्षी शिंदेंनी १९०१-१९०३ या कालावधीत धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता़ तेथून आल्यानंतर कॉलेज पातळीवर बापूसाहेबांनी महर्षी शिंदे यांच्याबद्दल भाषण व व्याख्याने दिली़नगर जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातून विविध क्षेत्रात सत्तास्थानी जी मंडळी आली, त्या अनेकांना बोटाला धरून बापूसाहेबांनीच पुढे आणले़ ग्रामीण विद्यापीठ निर्माण व्हावे हे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले़ ‘‘मरेपर्यंत समाजसेवा करणार’’ अशी प्रतिज्ञा नगर कचेरीत जाऊन  बापूसाहेब व हिराबाई यांनी स्टँपपेपरवर घेतली होती. हिराबाई वारल्यानंतर (१९८५), त्यांनी ते प्रतिज्ञापत्र ट्रेझरीतून आणले व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यालयात दिले. कर्मठपणा, कोतेपणा, कपट याचा त्यांना कधीही स्पर्शही झाला नव्हता. ते भारतीय लोकशाही क्रांतीच्या चळवळीला जीवन समर्पित केलेले व साम्यवादाकडे झुकलेले सच्चे देशभक्त होते! अखेर ५ जानेवारी १९९१ रोजी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या थोर समाजसेवकास व स्वातंत्र्यसेनानीस विनम्र अभिवादन!

लेखक - कॉ. विद्याधर औटी (लेखक माजी प्राचार्य आहेत.)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत