अहमदनगर : येथील पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या रुंदीकरणात पत्र्याचे शेड, विद्युत खांब, दुकानांचे पक्के बांधकाम आडवे येत आहे. पालिकेतील बांधकाम, पाणी पुरवठा आणि अतिक्रमण विभागांत समन्वय नाही. त्यामुळे हे काम रखडले असून, त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
महापालिकेने सावेडी उपनगरातील तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. सुमारे ३ कोटी रुपये खर्चून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ए. जी. वाबळे कंस्ट्रक्शन ॲण्ड हेवी मशनरीज कंपनीला १६ जून २०२०पर्यंत मुदत होती. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही, असा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र रुंदीकरणाच्या आड येणारी झाडे, विद्युत खांब, ड्रेनेजलाईन, पाण्याची लाईन आणि दुकानदारांची अतिक्रमणे पूर्णपणे काढण्यात आलेली नाहीत. तसे ठेकेदाराकडून वेळोवेळी रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. ही कामे बांधकाम, पाणी पुरवठा, उद्यान, विद्युत आणि अतिक्रमण विभागाशी संबंधित आहेत. बांधकाम विभागाकडून वेळोवेळी या विभागांना सूचना केल्या गेल्या; परंतु ही कामे अद्याप पूर्ण केली गेली नाही. ठेकेदाराने ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली, अशा ठिकाणी काम पूर्ण केले. उर्वरित काम अपूर्ण असून, पालिकेतील विविध विभागांत समन्वय नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
तोफखाना पोलीस चौकी ते सोनानगरपर्यंतच्या डाव्या बाजूचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उजव्या बाजूचे कामही श्रमिकनगरपर्यंत पूर्ण झालेले आहे. सोनानगर ते श्रमिकनगर या मार्गावरील झाड उद्यान विभागाने अद्याप काढलेले नाही. त्यामळे हे काम थांबले आहे. श्रमिकनगर ते कुष्ठधाम या मार्गावरील दुकानदार काम करण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे या मर्गावरील साईडपट्टीचे काम अपूर्ण राहिलेले आहे. कुष्ठधामपर्यंतच्या रस्त्यावर टपऱ्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा निचरा होणेही आवश्यक आहे. भिस्तबाग चौकापर्यंत उजव्या व डाव्या बाजूचा रस्ता काम करण्यासाठी मोकळा करून मिळावा, अशी मागणी ठेकेदाराकडून पत्राद्वारे पालिकेकडे करण्यात आली आहे.
....
जोड रस्त्यांची समस्या गंभीर
तोफखाना पोलीस चौकी ते भिस्तबाग महाल या मार्गावर ७ ते ८ जोड रस्ते येतात. हे सर्व रस्ते मुख्य रस्त्यापासून उंचावर आहेत. त्यामुळे या रस्त्यांचे पाणी मुख्य रस्त्यावर येऊन साचणार आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईड गटार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियोजन केल्यास हा रस्ता अधिक काळ टिकेल, अशी सूचनाही ठेकेदाराकडून करण्यात आली आहे.