अहमदनगर : सध्या सणासुदीचा काळ असून, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विविध वस्तूंवर ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सवलत योजना (स्किम) जाहीर करून लिंक पाठविल्या जातात. या माध्यमातून वस्तू मिळत नाहीच, मात्र बँक अकाऊंट साफ होत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. त्यामुळे खात्री करूनच ऑनलाईन शॉपिंग करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. उत्सव काळात तर या खरेदीचा मोठा जोर वाढतो. सायबर गुन्हेगार हीच संधी साधून फसवणूक करतात. अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून अपवादवगळता फसवणूक होत नाही. मात्र, खरेदी - विक्रीच्या बनावट वेबसाईट तयार करून सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात ओढतात. एका वस्तूवर चार वस्तू फ्री, शुल्कही अगदी कमी, आदी स्वरुपाच्या ऑफर्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या जातात. वस्तू बुक करताना आधी पेमेंट घेतले जाते. प्रत्यक्षात ती वस्तू मिळत नाही. त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास न ठेवता खातरजमा करून वस्तू खरेदी करणे महत्त्वाचे ठरते.
...अशी होऊ शकते फसवणूक
कधी आकर्षक ऑफर देऊन वस्तू न देता ग्राहकांना फसविले जाते, तर कधी ऑफर बुक करतानाच पाठविलेल्या लिंकवर क्लिक करून पुढील प्रक्रिया केल्यानंतर खात्यातून पैसे जातात. एखादी वस्तू ऑनलाईन बुक केल्यानंतर ती वेळेत मिळाली नाही तर काही जण कस्टमर केअरला फोन करतात. मात्र, बहुतांश वेळा फेक कस्टमर केअरला फोन लागतो. अशा वेळीही फसवणूक होते.
--------------------
...ही घ्या काळजी
विश्वासार्ह वेबसाईटवरूनच खरेदी करा, एसएसएल असलेल्या साईट्सद्वारेच खरेदी करा. कारण या वेबसाईट्स युझर्सने इनपूट केलेला डेटा संग्रहीत करण्यास अधिक सक्षम आहेत. या साईट्स ओळखणे सोपे आहे. कारण त्या एचटीटीएऐवजी एचटीटीपीएसने सुरू होतात आणि त्यांच्या ॲड्रेस बारमध्ये लॉक पॅडलॉक चिन्ह असते. वेबसाईटचे लुक्स बघून खरेदी करू नका.
-----------------------
उत्सव काळात नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. ज्या जाहिरातीत अत्यल्प शुल्कात महागड्या वस्तू देण्याची ऑफर्स आहे, अशावेळी फसवणुकीचे शक्यता जास्त असते. तसेच वस्तू हातात पडल्यानंतर पेमेंट करावे, आधी पैसे देऊ नये. अशी दक्षता घेतली तर फसवणूक टळते.
-नंदकुमार दुधाळ, निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, अहमदनगर