अहमदनगर : बदलत्या काळानुसार दैनंदिन जीवनातील ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यात तरुण-तरुणी सर्वाधिक सक्रिय आहेत. आता तर आयुष्याचा जोडीदारही ऑनलाईन शोधण्याचे मोठे फॅड वाढले आहे. प्रत्यक्षात मात्र स्वप्नातील राजकुमार अथवा राजकुमारी ऑनलाईन शोधताना फसवणूक होऊन अनेकांचा लग्नाआधीच खिसा रिकामा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
लग्न जुळविणाऱ्या अनेक वेबसाईट इंटरनेटवर सक्रिय आहेत. लग्नासाठी अनेक मुले-मुली स्वत:ची इत्यंभूत माहिती या साईटवर अपलोड करतात. तसेच याच साईटवर अपेक्षित जोडीदाराचा शोध घेतात. यातील कुणी पसंत पडले तर, त्याला संपर्क केला जातो. या माध्यमातून काहींचे विवाह यशस्वी झाले असले तरी बहुतांशी जणांची फसवणूक झाली आहे. विवाह विषयक साईटवर फसवणुकीच्या उद्देशाने सायबर गुन्हेगारांनी फेक प्रोफाईल तयार केलेल्या असतात. लग्नासाठी तरुण-तरुणी संपर्कात येताच त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते.
----------------------------
अशी होऊ शकते फसवणूक
फेक प्रोफाईलची सत्यता पडताळून न पाहता तरुण-तरुणी समोरच्या व्यक्तीच्या संपर्कात येतात. लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न समोरील व्यक्ती दाखविते. तसेच समाेरील व्यक्ती खूप श्रीमंत आहे, असेही भासविले जाते. काही दिवस संपर्कात राहिल्यानंतर अडचण असल्याचे भासवून आधी थोड्या पैशांची मागणी केली जाते. नंतर जास्त पैसे मागितले जातात. अपेक्षित पैसे मिळाले की, समोरील व्यक्ती संपर्क बंद करते. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. काही प्रकरणात तर मुलींना भेटण्यासाठी बोलावून लूटमारीचेही प्रकार समोर आले आहेत.
-----------------------------
ही घ्या काळजी
लग्नासाठी जोडीदार ऑनलाईन शोधला असेल तर प्रथम त्याची सत्यता पडताळून पाहावी. घरातील नातेवाईकांसोबत प्रत्यक्षात त्याची भेट घेऊन चौकशी करावी. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तीने कोणतेही कारण सांगितले तरी त्याला पैसे पाठवू नयेत. समोरील व्यक्तीने भेटण्यासाठी बोलविल्यास एकट्या तरुणीने जाऊ नये.
-------------------------------
विवाह संदर्भातील वेबसाईटवर सायबर गुन्हेगार फेक प्रोफाईल तयार करतात. त्यामुळे लग्नासाठी जोडीदार शोधताना सदर वेबसाईट अथवा समोरील व्यक्तीची प्रथम सत्यता पडताळून पाहावी. लग्नाचा निर्णय घेताना तरुण-तरुणीने घरातील नातेवाईकांना विश्वासात घ्यावे. ऑनलाईन संपर्कात आलेल्या व्यक्तीने पैशांची मागणी केली तर त्याला पैसे देऊ नयेत. तसेच फसवणूक झाली तर, तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा.
- नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन
--